महापालिका क्षेत्रातही ‘जलयुक्‍त’ अभियान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

धुळे - नदी, नाल्यांलगत अतिक्रमण थांबवायचे असेल, रहिवाशांच्या जीवाला धोका कमी करायचा असेल, तर सर्वच पालिका क्षेत्रांतही जलयुक्त शिवार अभियान राबविले जावे, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी दिले. या धर्तीवर त्यांनी येथील महापालिका क्षेत्रात हाती घेतलेल्या कामास प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी मंजुरी दिली आहे. 

अभियानांतर्गत येथील महापालिका क्षेत्रातील हे पहिले काम ठरल्याचा दावा आहे. लोकसहभाग आणि पालिका यंत्रणांच्या माध्यमातून जलयुक्‍त शिवार अभियान राबविले जावे, अशी कोळवले यांना अपेक्षा आहे. दरम्यान, शहरातील कोळवले नगराजवळील सिंधी नाल्यावर लोकसहभागातून, तसेच कोळवले यांच्या आर्थिक सहकार्यातून दगडी बंधरा बांधण्याचा प्रस्ताव सादर झाला. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. जलयुक्‍त शिवार अभियानात लोकसहभाग मिळविण्यासाठी बैठकीत सर्वकष चर्चा झाली. त्या वेळी प्रांताधिकारी तथा धुळे तालुका जलयुक्‍त शिवार समितीचे अध्यक्ष मिसाळ यांनी श्री. कोळवले यांना सिंधी नाल्यावर लोकसहभागातून व स्वखर्चातून काम करण्याबाबत मंजुरीचे पत्र दिले. तसेच २२ लाख खर्चाच्या कामास पाटबंधारे विभागानेदेखील मंजुरी दिली. या कामास गट क्रमांक ४९७, ४९३, ४९५, ४९८ वरील मालमत्ताधारकांनी संमतीदर्शक करारनामा करून दिला, असे श्री. कोळवले यांनी सांगितले. 

हा आदेश पारित झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामास सुरवात झाली. मात्र या भागातील राजकीय व्यक्‍तींचा हस्तक्षेप व द्वेषबुद्धीतून कामात अडथळे आणले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे योग्य नियोजन, मिसाळ, अभियंता पाटील यांच्या सहकार्याने काम सुरू असल्याचे श्री. कोळवले यांनी म्हटले आहे.