'साहित्यातील समज नसलेले सरकार '

'साहित्यातील समज नसलेले सरकार '

नाशिक - मराठी भाषा समृद्ध करणे, वाढविणे अन्‌ तिला समृद्ध करणे, हे साहित्यिकांच्या हातात आहे. त्यामुळे साहित्यातील समज नसलेल्या सरकारवर अवलंबून राहू नये, असे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी मधु मंगेश कर्णिक यांनी आज येथे सांगितले. तसेच मराठी भाषेच्या अभिजात दर्जासह मराठी भाषा भवन, अशा कामांत विद्यापीठ, साहित्य परिषद, लेखक, कवींनी योगदान द्यावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. असह्य माणसाला वाचविण्याऐवजी नेते तुंबडी भरण्यात गुंतल्याचा टोला समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी लगावला. 

गोदाकाठी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कुसुमाग्रज यांनी साहित्यातून आनंदलोकाची निर्मिती करत आनंदाची उधळण केली. अशा आनंदलोकामधील महाकवी कालिदास कलामंदिरात महाकवी तात्यासाहेबांचा जन्मदिन अन्‌ मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषेतील मानाच्या जनस्थान पुरस्कार प्रदान सोहळा आज झाला. श्री. कर्णिक यांनी एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन डॉ. राजाध्यक्ष यांचा गौरव करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह मकरंद हिंगणे, खजिनदार डॉ. विनय ठकारे, सहकार्यवाह अरविंद ओढेकर, विनायक रानडे, डॉ. कुणाल गुप्ते उपस्थित होते. 

श्री. कर्णिक यांनी रुग्णालय, रस्ते, धरणे बांधायला हवीत, असे सांगत असतानाच कविता, साहित्य, संस्कृतीचे मनात स्थान राहायला हवे, असे अधोरेखित केले. श्री. कर्णिक यांनी राजधानी मुंबईत मराठी भाषा भवनाचा आग्रह धरला, पण काम मंद गतीने सुरू असल्याचे सांगितले. बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक अर्धवट असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खरे म्हणजे, स्मारकांमुळे भाषा लौकिकार्थाने पुढे जात नसली, तरीही स्मारक प्रेरणादायी ठरत असल्याने सरकारवर अवलंबून राहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अभिजात दर्जाबद्दलची औपचारिकता बाकी 
गोदावरीच्या तटावर तीर्थरूप कुसुमाग्रजांचे शब्द सुभाषित झाले असताना, मराठी भाषेबद्दल चिंता केली जाते. पण संत-परंपरेप्रमाणेच केशवसुत, कुसुमाग्रजांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे सांगून श्री. कर्णिक म्हणाले, की मराठी भाषा अभिजात आहे. तिच्या दर्जाबद्दलची औपचारिकता बाकी आहे. आपण चांगले लिहिल्याने अभिजात दर्जा मिळणार आहे. मुळातच गंगाधर गाडगीळ यांच्यानंतरच्या आमच्या पिढीने कुणालाही नाकारले नाही. त्यांची परंपरा पुढे आणली. आता मात्र नाकारण्याची घाई सुरू आहे. कवितांमधून केशवसुत, बालकवी गेले आहेत. आताच्या पुस्तकांमधील कवितांमधून कोणते कवी हवेत, यासाठी राजकीय प्रभाव असतो. सरकारी पुरस्कारापासून ज्ञानपीठापर्यंत काय चालते, हे आम्ही पाहिले आहे. वास्तविक पाहता, केशवसुतांनी सामाजिक कविता लिहिली. त्यामुळे पूर्वजांचा वारसा घेऊन कविता लिहिता येते, हे कुसुमाग्रजांनी दाखविले. शिवाय मराठी समीक्षा डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी समृद्ध केली. कुसुमाग्रजांनी संपूर्ण साहित्य, कवितांवर प्रेम केले. आमच्या पाठीवर थाप दिली. त्यामुळे आमचा कालखंड मराठी भाषेच्या समृद्धतेचा राहिला. 

कुसुमाग्रज सर्वकालीन अन्‌ समकालीन 
कुसुमाग्रज एकेकाळी होऊन गेलेले नव्हे, तर सर्वकालीन अन्‌ समकालीन आहेत, असे डॉ. राजाध्यक्ष यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. तात्यासाहेबांनी "पाठीवर हात ठेवून लढ म्हणा!' असे सांगितल्याचे नमूद करत त्यांनी लढ म्हणणारे लेखक, कवी, मोठी माणसं किती राहिलीत, असा प्रश्‍न उपस्थित केला. उद्दिष्टासाठी चालत राहणे, हे समाजातून नाहीसे झाले आहे, अशी खंत व्यक्त करत त्यांनी कुसुमाग्रज आव्हाने स्वीकारत किनारा जपत होते, याकडे लक्ष वेधले. स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा अवमान करायचा नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, की आक्रोश करणाऱ्या आदिवासी, दलित स्त्रियांपर्यंत चळवळीची लाट पोचली नाही. त्यामुळे काबाडकष्ट अन्‌ निराधारपणा संपलेला नाही. याशिवाय समाजसुधारकांसह कुसुमाग्रजांना सरहद्दी नको होत्या. पण आता केशवसुतांचे उद्‌गार कोणाला ऐकायला येतो की नाही, असा प्रश्‍न तयार झाला आहे. सरहद्दी वाढल्याने साकल्याचा प्रदेश, एकसंघपणा राहिलेला नाही. म्हणूनच संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम कुठे आहेत, असा प्रश्‍न विचारावा वाटतो. 

श्री. हिंगणे यांनी प्रास्ताविकात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या उपक्रमांचा आढावा घेतला. जीवनाचा गहन अर्थ सांगणाऱ्या कुसुमाग्रजांच्या "नौका' कवितेचे सादरीकरण करण्यात आले. कवी किशोर पाठक यांनी डॉ. राजाध्यक्ष यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. कुसुमाग्रजांच्या "सर्वात्मका सर्वेश्‍वरा' काव्याने सोहळ्याची सांगता झाली. 

कोण काय म्हणाले?.... 

मधु मंगेश कर्णिक 
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये काम करताना सुखद अनुभव येतो 
- मी आणि डॉ. विजया राजाध्यक्ष समकालीन असलो, तरी त्या ज्येष्ठ 
- जीवनाबद्दल आकलन करून आम्ही लिहिले 
- विजयाबाईंनी बहुलक्षी लेखन केले असून, त्यांच्या कथेची आणखी व्हावी समीक्षा 
- केशवसुतांच्या मालगुंड जन्मस्थानातून मिळते ऊर्जा 

डॉ. विजया राजाध्यक्ष 
- पंढरी, देहू, आळंदीला वारकरी श्रद्धेने, आनंदाने जातात तसे नाशिकला येऊन कुसुमाग्रजांचे घेतले जाते दर्शन 
- कुसुमाग्रजांना तेजाप्रमाणेच माती-भूमी हवी असल्याने पृथ्वी त्यांच्या कवितांच्या सूर्याभोवती फिरत राहिली 
- कुसुमाग्रजांच्या कालखंडातील मंतरलेल्या दिवसांनी सर्वांवर केले होते गारुड 
- कुसुमाग्रजांच्या कवितांसमवेतचा प्रवास सुंदर होता आणि तो सुंदरच राहणार आहे 
- मराठी माध्यमाच्या शाळा आवश्‍यक असून, प्रत्येकाचा मराठीशी अनुबंध राहण्यासाठी सांस्कृतिक निर्णय घ्यावा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com