जायकवाडीच्या जाचातून नाशिक, नगरची मुक्तता!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

मागील वर्षी न्यायालयाने वरील धरण समूहांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर त्या निर्णयाला व मेंढेगिरी समितीच्या तक्‍त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या. त्या सर्व याचिकांवरील सुनावणी एप्रिल महिन्यात पूर्ण झाली आहे. परंतु, न्यायालयाने अद्याप त्या याचिकांवर निर्णय दिला नसल्याने मेंढेगिरी समितीचा हा तक्ता अजून लागू आहे.
- राजेंद्र जाधव, अध्यक्ष, जलचिंतन संस्था. 

जायकवाडी धरण 65 टक्के भरल्याने वरच्या धरणांमध्ये 82 टक्के पाणीसाठ्याची मुभा
नाशिक - गोदावरी ऊर्ध्व खोऱ्यात जुलै व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जायकवाडी धरणात बुधवारी 65 टक्के म्हणजे 50 टीएमसीवर साठा झाला आहे. यामुळे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधील संपूर्ण पाणीसाठा या वर्षी स्थानिक लाभार्थ्यांना शेती व पिण्याला वापरण्यासाठी मिळणार आहे.

मेंढेगिरी समितीनुसार जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागातील धरणांमधून समन्याय तत्त्वानुसार गंगापूर, पालखेडसमूहात 82 टक्‍के पाणी ठेवण्याची परवानगी आहे. तसेच, दारणा समूहात 102 टक्के पाणी ठेवण्याची परवानगी असल्यामुळे आता ऑक्‍टोबरमध्ये धरणांमधील पाण्याचे नियोजन करताना जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याची गरज पडणार नाही, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा जमा व्हावा, यासाठी सरकारने वेगवेगळे नियम करून ऊर्ध्व भागात धरणे बांधण्यावर निर्बंध आणले आहेत. त्याचवेळी राज्यात 2005 मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण या कायद्याद्वारे समन्याय तत्त्वाने पाणीवाटपाचे धोरण जाहीर केले.
या कायद्यानुसार ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणीसाठ्याचे समन्याय तत्त्वाने वाटप करण्यासाठी मेंढेगिरी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालाप्रमाणे गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे समन्याय तत्त्वाने वाटप करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मागील वर्षी जायकवाडीत खूपच पाणीसाठा असल्यामुळे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार वरील धरणांमधून पाणी सोडले होते. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ऑगस्टमध्येच जायकवाडीत 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी पाणीसाठा आला आहे. अजून पावसाळ्याचे दीड महिने उरले असून, त्यात चांगला पाऊस झाल्यास यंदा जायकवाडीत पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यांतील गंगापूर, दारणा, पालखेड, मुळा व प्रवरा या धरण समूहांमधील सर्व पाणीसाठा स्थानिक गरजा भागविण्यासाठी वापरता येणार आहे.

 

Web Title: Jayakwadi the administered Toon Nashik, Nagar release!