नाशिकला दोन्ही कॉंग्रेससह मनसेची आघाडी ? 

संपत देवगिरे
शनिवार, 7 जानेवारी 2017

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच गेल्या दोन महिन्यात चाळीस नगरसेवकांच्या पक्षांतराचा विक्रम नाशिकमध्ये घडला. हे पक्षांतर प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपकडे झाल्याने उर्वरीत पक्षांविषयी झालेल्या नकारात्मक राजकीय वातावारणाला प्रत्युत्तर म्हणून सक्षम पर्याय निर्माण करण्याचे सध्या दोन्ही कॉंग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी 'मनसे'लाही बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील एक नवा राजकीय प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. 

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्याच पक्षांच्या बैठका होत आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरिक्षक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत आव्हाड यांनी शिवसेना, भाजपला पर्याय म्हणून 'मनसे'ला बरोबर घेऊन प्रबळ आघाडी निर्माण करण्याबाबत चाचपणी केली. त्याला राजकीय जाणकारांनीही प्रतिसाद दिल्याने स्थानिक पातळीवर हालचाली झाल्या. मात्र, त्यावर लगेचच टीका झाल्याने त्या हालचाली लगेच थांबल्या. या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेस एकत्र याव्यात काय, याविषयीही कॉंग्रेसमध्येच दोन मतप्रवाह आहेत. त्यात विद्यमान नगरसेवकांना आपल्या जागा वाचवायच्या असल्याने त्यांना आघाडी हवी आहे. तर निवडणुकांत फारसे यश मिळेल अशी खात्री नसलेले मात्र चर्चेला फाटे फोडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यातही या विषयावरील चर्चेत स्थानिक पातळीवर निर्णय होईल असे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे काही पदाधिकारी सर्व पक्षांतील नेत्यांशी थेट संपर्क अन्‌ बैठकांद्वारे आघाडी प्रत्यक्षात यावी यासाठी मनापासून कामाला लागलेत. शुक्रवारी त्यासाठी तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांशी चर्चा झाल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते. 'मनसे' सध्या भाजप आणि शिवसेना विरोधात आक्रमक झाली आहे. मात्र, त्या पक्षाचे धोरण पाहता अशी आघाडी झाल्यास निवडणुकीनंतरही अनेक प्रश्‍न निर्माण होतील. त्याचा निवाडा अवघड असल्याने आघाडी नाशिकला होणार असली तरीही तिला जन्म द्यायचा की नाही, हे मात्र मुंबईतच ठरणार आहे. 

पुढाकार कोण घेणार? 
दोन्ही कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांना सध्या पक्षांतर्गत विरोधकांशी संवादाचा पूल बांधण्यातच आपला बराचसा वेळ खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत निवडणुकीची तयारी दुर्लक्षीत झाल्याचे वातावरण झाले. त्यामुळे आघाडी सगळ्यांनाच हवी आहे. मात्र, यापूर्वी त्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांवरच टीका झाल्याने आता पुढाकार कोण घेणार? हा प्रश्‍न आहे.