'सटाणा शहरात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी करावी'

Baglan
Baglan

सटाणा : दररोजच्या मोठ्या अवजड वाहतुकीमुळे सटाणा शहरातून जाणारा विंचूर-प्रकाशा राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. शहराबाहेरील वळण रस्त्याचे प्रलंबित काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत शहरातील महामार्गावर सर्व अवजड वाहनांना दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी करावी. तसेच मालेगाव - सटाणा या राज्यमार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता टेहरे फाट्याजवळ अवजड वाहनांना प्रतिबंध करावा. या मागण्यांसाठी आज मंगळवार (ता.१) रोजी महाराष्ट्र दिनापासून बागलाण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या मागण्यांबाबत गेल्या आठ दिवसांपूर्वीच संघातर्फे तहसीलदार, पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याचे पत्रकार संघातर्फे सांगण्यात आले. आज सकाळी सुरु करण्यात आलेल्या या आंदोलनास शहर व तालुक्यातील जनतेकडून उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे. बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष संगीता देवरे, समको बँकेचे अध्यक्ष पंकज ततार, बाजार समितीचे माजी सभापती अनिल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे, दीपक रोंदळ, वैभव गांगुर्डे, बी.डी.पाटील, प्रफुल्ल ठाकरे आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. 

यावेळी बोलताना संघाचे तालुकाध्यक्ष विश्वास चंद्रात्रे म्हणाले, शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतुकीमुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरु असून गेल्या काही वर्षात हजारो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाणे, बँका, पतसंस्था, बसस्थानक, हॉटेल्स, उपहारगृहे असून शहर व तालुक्यातील हजारो जनतेचा वावर परिसरात असतो. शालेय विद्यार्थ्यांना तर आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. गुजरात राज्याला जोडणारा अत्यंत जवळचा महामार्ग असल्याने या महामार्गावर दररोज हजारो अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अनेक लहान - मोठे अपघात होत असतात. ता. १० मे २०१६ रोजी महामार्गावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हीपीएन विद्यालयाजवळ गॅसचे टँकर उलटून झालेल्या स्फोटांच्या मालिकेमुळे शहरवासीय हादरून गेले होते. या पार्श्वभूमीवर सटाणा शहराला पूर्व व पश्चिम बाजूकडून वळण रस्ता व्हावा, यासाठी शहरातील अनेकवेळा विविध संघटनांनी सनदशीर मार्गाने आंदोलनेही केलेली आहेत. मात्र ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. 

या महामार्गाला केंद्र शासनाने नुकताच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ असा दर्जा बहाल केला असून तशी अधिसूचना देखील काढली आहे. लवकरच चौपदरीकरणासोबत वळण रस्त्याचे काम सुरु होईल, असे आश्वासन लोकप्रतिनिधी देत आहेत. मात्र अजूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत वळण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स, बारा चाकी, १६ चाकी व इतर सर्व अवजड वाहनांना प्रवेशबंदी असावी.

मालेगाव - सटाणा या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात ब्राह्मणगाव येथे दोन शाळकरी मुले तर लखमापूर येथे बसस्थानकावर एक व्यक्ती अवजड वाहतुकीचे बळी ठरले होते. या अपघातांना आळा घालण्यासाठी सोयगावजवळील टेहरे फाट्यालगत रस्त्यावर दोन्ही बाजूला आडवे अँगल लावावेत. त्यामुळे अवजड वाहनांना प्रतिबंध बसेल. प्रशासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार श्री. चंद्रात्रे यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनात संघाचे खजिनदार अंबादास देवरे, कैलास येवला, सरचिटणीस रोशन खैरनार, कार्याध्यक्ष सतीश कापडणीस, जिल्हा पदाधिकारी काशिनाथ हांडे, उपाध्यक्ष रमेश देसले, नंदकिशोर शेवाळे, अरुणकुमार भामरे, दीपक खैरनार, संजय खैरनार, शशिकांत बिरारी, अशोक गायकवाड, संजय जाधव, परिमल चंद्रात्रे, राकेश शिरोडे, प्रशांत बैरागी, राकेश येवला, सुनील येवला, प्रफुल्ल कुवर, सुनील खैरनार, रोशन भामरे, प्रशांत भामरे, महेश भामरे, रणधीर भामरे, चेतन देवरे, कृष्णा मोहन, मनोहर बागुल, साहेबराव काकुळते, सुभाष येवला, सुरेश बच्छाव आदींसह पत्रकार व नागरिक सहभागी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com