काकडबागेतील जागेच्या वाद प्रकरणात पोलिसांच्या आदेशास न्यायालयाची स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नाशिक - केटीएचएम महाविद्यालयासमोरील काकडबाग येथील झोपडपट्टीची जागा सात दिवसांच्या आत खाली करण्याच्या पोलिस उपायुक्तांच्या आदेशास न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत "जैसे थे' आदेश दिला आहे. 

नाशिक - केटीएचएम महाविद्यालयासमोरील काकडबाग येथील झोपडपट्टीची जागा सात दिवसांच्या आत खाली करण्याच्या पोलिस उपायुक्तांच्या आदेशास न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत "जैसे थे' आदेश दिला आहे. 

पोलिस उपायुक्तांनी 11 मार्चला काकडबाग येथील रहिवाशांना नोटीस पाठवून ही जागा पोलिस खात्याची असल्याने सात दिवसांत रिकामी करावी, असे कळविले होते. या नोटिशीला काकडबाग परिसरातील 20 रहिवाशांनी दिवाणी न्यायालयात आव्हान देणारा दावा दाखल केला आहे. त्यावर आज दिवाणी न्यायाधीश श्रीमती जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सात दिवसांची मुदत संपल्याने पोलिसांतर्फे उद्या (ता. 21) झोपडपट्टी हटविण्याची कारवाई होणार होती. न्यायालयाने मनाई हुकमाच्या अर्जावरील आदेशास 3 एप्रिलपर्यंत स्थगिती दिल्याने तूर्त पोलिसांना कारवाई करता येणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

जिल्हा न्यायालयासाठी पोलिसांची जागा देण्यास पोलिस आयुक्तांनी विरोध केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही जागा हस्तांतरित झाल्यावर आता पोलिसांनी तातडीने काकडबागेतील जागेवर आपला कब्जा जमविण्याचा प्रयत्न केला होता, पण हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर पोलिसांना कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.