केडगावात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळी घालून हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

केडगाव येथील नगरसेवकपदासाठी पोटनिवडणुकीचा निकाल लागून सहा तास उलटले नाही तोच शिवसेनेच्या केडगाव येथील दोन नेत्यांची कोयत्याने वार करून व गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे केडगाव उपप्रमुख संजय कोतकर व पदाधिकारी वसंत ठुबे अशी त्यांची नावे आहेत. 

नगर : केडगाव येथील नगरसेवकपदासाठी पोटनिवडणुकीचा निकाल लागून सहा तास उलटले नाही तोच शिवसेनेच्या केडगाव येथील दोन नेत्यांची कोयत्याने वार करून व गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे केडगाव उपप्रमुख संजय कोतकर व पदाधिकारी वसंत ठुबे अशी त्यांची नावे आहेत. 

केडगाव येथील शाहूनगर परिसरात त्यांच्यावर आधी गोळ्या झाडण्यात आल्या. नंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे दोघांचेही मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून होते. या घटनेने नगर शहरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर विजयी झाले. आज दुपारी हा निकाल जाहीर झाल्यानंतर केडगावमध्ये जल्लोष झाला. विशाल कोतकर हे माजी महापौर अशोक कोतकर यांचे चुलतभाऊ आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. या वादातूनच ही हत्या झाल्याचे सांगितले जाते. 

दरम्यान, काही जणांनी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांचा वाहनावरून पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. नंतर कोयत्याने वार करून त्यांचा निर्घुणपणे खून करण्यात आला. यात दोघेही जागीच ठार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाला कोणी हात लावण्यास पुढे येत नसल्याचे सांगितले जाते. काही वेळानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ते घटनास्थळी दाखल झाले. 

Web Title: Kedgaon Crime Shivsena Leaders Murder firing