बोरदैवतला माळरानावर फुलली केशराची शेती

भरत पाटील
बुधवार, 5 एप्रिल 2017

अभोणा - काश्‍मीरसारख्या थंड प्रदेशात फुलणारे केशर उष्ण वातावरणात पिकविण्याची किमया बोरदैवत (ता. कळवण) येथील तरुण आदिवासी शेतकऱ्याने केली. या तरुणाचे नाव आहे, अनिल पवार. पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची खूणगाठ बांधलेल्या या तरुण शेतकऱ्याने चक्क केशरची शेती फुलवत स्थानिक पिकांमधील बदलाचा मार्ग मोकळा करून दिला.

अभोणा - काश्‍मीरसारख्या थंड प्रदेशात फुलणारे केशर उष्ण वातावरणात पिकविण्याची किमया बोरदैवत (ता. कळवण) येथील तरुण आदिवासी शेतकऱ्याने केली. या तरुणाचे नाव आहे, अनिल पवार. पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची खूणगाठ बांधलेल्या या तरुण शेतकऱ्याने चक्क केशरची शेती फुलवत स्थानिक पिकांमधील बदलाचा मार्ग मोकळा करून दिला.

शेतकरी अनिल पवार अल्पशिक्षित असले, तरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची धडपड आहे. पारंपरिक पिकांसह बटाटा, हळद, पांढरी मुसळी, स्टॉबेरी, लसूण यांसारखी विविध पिके घेत शेतीत प्रयोग केले. उत्पादन चांगले घेऊनही योग्य भाव न मिळल्याने हताश न होता शेतीत विविध प्रयोग सुरूच आहेत. मुलगा योगेश व भाऊ राजेंद्र पवार हे दोघेही नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. ‘सकाळ’चे ते जुने वाचक असून, गेल्या वर्षी जुलैमध्ये रतलाम (मध्य प्रदेश) येथील शेतकऱ्याची ‘सकाळ’मधील केशर शेतीची मुलाखत वाचली. याबाबत कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा केली.

केशर पिकाची माहिती मिळविण्याची जिज्ञासा वाढू लागली. इंटरनेट व राज्य शासनाच्या किसान हेल्पलाइनच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील शेतकऱ्याशी संपर्क केला. या पिकाविषयी प्राथमिक माहिती मिळविली. सुरवातीला सात हजारांत तीनशे ग्रॅम अमेरिकन हायब्रीड केशर जातीचे बियाणे मिळविले. कोकोनट ट्रेमध्ये त्याची रोपे तयार करून अर्ध्या एकर क्षेत्रात त्याची लागवड केली. यात सुमारे दहा टक्के रोपाला मर आला.

जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असावा. पाच महिने लागणाऱ्या केशर पिकाला अर्ध्या एकरात पन्नास हजार रुपये खर्चून २५ किलोचे उत्पादन मिळविले. किलोला ४० ते ६० हजार रुपये भाव मिळण्याचा अंदाज आहे. महिनाभरापासून बाजारपेठेच्या शोधात असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
 

असे असते केशर
खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते ते इरिडेसी कुलातील आहे. त्याचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण मध्य आशियातील आहे. फ्रान्स, स्पेन, इटली, भारत, चीन व पाकिस्तान आदी देशांत त्याची लागवड होते.  

असा ठरविता येतो दर्जा
केशर मिळविण्यासाठी फुलातील कुक्षीची टोके अगदी सकाळी खुडतात. ती उष्णतेने किंवा उन्हात वाळवतात. सुमारे ४० हजार फुलांपासून अर्धा किलो केशर मिळते. यामुळे ते महाग असते. दर्जा ठरविण्यासाठी ते पाण्यात टाकतात. तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे, तर पाण्यावर तरंगणारे हलक्‍या प्रतीचे मानतात. 

पारंपरिक पिके घेऊन समाधानकारक उत्पादन मिळायचे नाही. पीकपद्धतीत विविध प्रयोग करण्याचे स्वप्न, जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. पहिल्याच प्रयत्नात काका व भावाच्या मार्गदर्शनाने केशर शेतीचा प्रयोग यशस्वी केला.  - अनिल पवार, शेतकरी

प्रयोगांतून शेती करण्याची भाऊ अनिल यांची सवय आहे. म्हणून केशर शेतीविषयी ‘सकाळ’मध्ये बातमी वाचली. किसान हेल्पलाइन व इंटरनेटद्वारे पिकाविषयी माहिती घेतली. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक शेती, उत्पादनात वाढ व उत्तम बाजारपेठेविषयी प्रबोधन करण्याची गरज आहे.
- राजेंद्र पवार, अभोणा

Web Title: keshar agriculture in bordaivat