किडनी विकाराच्या रुग्णांची संख्या वाढतेय - डॉ. नागेश अघोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

धुळे - किडनीशी संबंधित आजारांचे वेळीच निदान आवश्‍यक ठरते. तसे न केल्यास किडनी निकामी होण्याची शक्‍यता असते. त्यास डायबेटिस, उच्च रक्तदाब, किडनीतील खडे, वेदनाशामक गोळ्यांचे अनावश्‍यक सेवन, जन्मतः व्यंग व जनुकीय ही कारणे महत्त्वाची असून, डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ वेदनाशामक औषधांचा वापर व उच्च रक्तदाबाने किडनी निकामी होणाऱ्या व डायलिसिसची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे नाशिक येथील किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. नागेश अघोर यांनी सांगितले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वोकहार्ट हॉस्पिटलतर्फे किडनीचे आरोग्य व अवयव प्रत्यारोपणासंबंधी मार्गदर्शन झाले, त्यात डॉ. अघोर बोलत होते. डॉ. अघोर यांनी मूत्ररोग, उच्च रक्तदाब, प्रोस्ट्रेटसंबंधित विकार तसेच शरीरातील किडनीचे कार्य व महत्त्व, उच्च रक्तदाब व किडनीचा परस्परसंबंध याबाबत माहिती दिली.

डॉ. अघोर यांनी सांगितले, की निरोगी शरीरासाठी प्रत्येकाने रोज तीन लिटर पाणी पिणे आवश्‍यक आहे. नियमित व्यायाम करावा. आहारातील मिठाचे प्रमाण सहा ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. व्यसनांपासून दूर राहणे, डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे टाळणे व परिवारातील ज्येष्ठांना या आजारांची पार्श्वभूमी असेल त्यांची खास काळजी व नियमित तपासणी आवश्‍यक ठरते. अवयवदानासंबंधी प्रबोधनामुळे समाजाचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. ऐच्छिक तसेच ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानाने रुग्णांना नवसंजीवनी मिळू शकते. अवयव निकामी झालेल्या रुग्णांची यादी आरोग्य विभागातर्फे नियंत्रित केली जाते व उपलब्धता व आवश्‍यकतेनुसार अवयव प्रत्यारोपण सरकारमान्य व संबंधित निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयात केले जाते.

नाशिक येथील वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये ३० हून अधिक रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण शस्रक्रिया झाल्या असून, त्यात विदेशातील तीन रुग्ण ‘मेडिकल टुरिझम’अंतर्गत असल्याचेही डॉ. अघोर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रशासनातील तीनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमासाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, वोकहार्टचे जनसंपर्क विभागाचे समृद्ध देशपांडे व देवेंद्र वाघ यांचे सहकार्य लाभले.