'कृष्णापुरी'तून पाणी चोरी करणारे पंप जप्त

दीपक कच्छवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

धरणात टाकण्यात आलेले पाणी पिण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे येथून पाणी चोरी होत असेल तर तत्काळ पाटबंधारे विभागाला कळवावे. पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार आहे. 
- आकाश शिंदे, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, चाळीसगाव.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) धरणात गिरणा धरणाचे पाणी टाकून हे धरण आठ टक्के भरण्यात आले. धरणात पाणी टाकण्याचा विषय सुरवातीपासूनच एकमेव 'सकाळ'ने लावून धरला होता. यामुळे धरणात पाणी आले असले तरी या पाण्याची चोरी होत होती. त्याबाबतचे वृत्तही "सकाळ'मध्ये झळकले. त्याची दखल घेत, पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष कृष्णापुरी धरणातून पाणी चोरी करणाऱ्यांचे वीज पंप जप्त केले. 

कृष्णापुरी धरणात "गिरणा'चे पाणी टाकल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात "सकाळ'ने 10 एप्रिलच्या अंकात "कृष्णापुरीतील पाण्याने ग्रामस्थांमध्ये आनंद' तसेच "चोरी रोखण्याचे पाटबंधारे विभागासमोर आव्हान' या मथळ्याखाली वृत्त केले होते. सध्याच्या परिस्थितीत हे पाणी ग्रामस्थांसाठी संजीवनी ठरलेले असताना त्याची वीज पंपाद्वारे चोरी होत होती. त्यामुळे "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन लघू पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश शिंदे, पाणीपुरवठा निरीक्षक विठ्ठल राजपूत, वसंत वाघ, छोटू चौधरी, या पथकाने काल (18 एप्रिल) दिवसभर धरणावर तळ ठोकला. 

पाच वीजपंप जप्त 

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) धरणातून पाणी चोरी करणाऱ्यांना अगोदर तंबी दिली. मात्र, तरीही काहींनी पाणी चोरणे सुरूच ठेवल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या पथकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत थांबून पाच वीजपंप जप्त केले. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा सूचित करून यापुढे पाणी चोरी करताना आढळून आल्यास, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. कृष्णापुरी धरणात असलेले पाणी उन्हाळ्यात मे महिन्यात टिकले पाहिजे, त्यामुळे अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

Web Title: Krushnapuri Water Theft Pump have been seized