कुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा

दीपक खैरनार
रविवार, 22 एप्रिल 2018

गावाला तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र संबंधित व्यक्तिने जलवाहिनी फोडल्याने नागरिकांना पाणी असूनही पाणीटंचाई जाणवत आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी.

- सविता ठाकरे, सरपंच, कुपखेडा

अंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी टाकीत साठवून ठेवलेले पन्नास हजार लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रविवारी (ता.२२) संतप्त रनरागिणींनी पिण्याच्या पाण्यासाठी नामपुर-सटाणा रस्त्यावर हंडा मोर्चा काढत तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन छेडले व संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बागलाण तालुक्यातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र ज्या गावात काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्याठिकाणी नियोजनाअभावी पाणीयोजना कुचकामी ठरताना दिसून येत आहेत. कुपखेडा हे १ हजार ३९२ लोकसंख्या असलेले गाव आहे. सन २०१४-१५ मध्ये गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली. गावाला पाणीपुरवठा करणारी पन्नास हजार लिटरची क्षमतेची टाकी बांधलेली आहे. तसेच गावात तीन कूपनलिका असून पाण्याअभावी या कूपनलिका देखील गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचे बोलले जाते. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दोन स्वतंत्र विहीरी आहेत. गावाशेजारील विहिर कोरडीठाक पडल्याने बंद स्थितीत आहे. त्यामुळे राजपुरपांडे येथून जलवाहिनीव्दारे गावाला पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या विहिरीने तळ गाठल्याने गावाला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
 
बुधवार (ता.१८) रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने अक्षय तृतीया सणासुदीला गावात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी टाकीत पन्नास हजार लिटर पाणी साठवून ठेवले होते. 

मात्र त्याच दिवशी अज्ञात व्यक्तीने गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनला बसविलेला व्हॉल्व्हची तोडफोड केल्याने टाकीत साठवून ठेवलेले तब्बल पन्नास हजार लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. त्या दिवसापासून नळयोजनेतून ग्रामस्थांना पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने संतप्त रणरागिणींनी रिकामे हंडे घेऊन सकाळी नामपुर-सटाणा रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले.

जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोविंद सोनवणे, निकेश कोळी, शांताराम बोडके दहा ते पंधरा पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला व संबंधित अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर ग्रामपंचायतीच्या आवारातही नागरिकांनी गर्दी केली होती. 

यावेळी सरपंच सविता ठाकरे, मनिषा काळवाळ, संगीता माळवाळ, अनिता गवळी, सखुबाई जगताप, नर्मदाबाई ठाकरे, रत्नाबाई गवळी, मिनाबाई ठाकरे, चिर्ताबाई ठाकरे, चिर्ताबाई देवरे, छायाबाई गवळी, पार्वताबाई देवरे, निंबा जगताप, लोटन ठाकरे, किरण ठाकरे, आनंदा जगताप, प्रशांत ठाकरे, सुभाष ठाकरे, परशराम देवरे उपस्थित होते.

संबंधित समाजकंटकाने पाईपलाईन फोडल्याने नागरिकांनी आंदोलन छेडले. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात कळविले असता पोलिस दखल घेतली. 

- सुनील ठाकरे, पोलिस पाटील
 

Web Title: Kupkheda Water Shortage Ladies have been Nervous and do agitation