वयोवृद्ध शेतकऱ्याची सोनजांब येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

कर्जमाफीच्या अध्यादेशातून निराशेमुळे विषारी औषधाचे सेवन

कर्जमाफीच्या अध्यादेशातून निराशेमुळे विषारी औषधाचे सेवन
लखमापूर (नाशिक) - शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यावर अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीचा अध्यादेश निघाल्यानंतर अनेकांची निराशा झाली आहे. अशाच निराशेतून सोनजांब (ता. दिंडोरी) येथील माधव बळवंत जाधव (वय 72) या वयोवृद्ध कर्जबाजारी शेतकऱ्याने आज आत्महत्या केली. द्राक्षबागेत फवारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन करून जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

जाधव यांनी 2010-11 मध्ये सोसायटीकडून द्राक्षबागेसाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यानच्या काळात दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे ते कर्जफेड करू शकले नाही. यंदा द्राक्षाचे चांगले पीक आले मात्र, भाव न मिळाल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुद्दल रकमेपेक्षा व्याजाचीच रक्कम जास्त झाली. दुसरीकडे सोसायटीकडून वसुलीसाठी सातत्याने तगादा सुरू होता. त्यातच, शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याने, संपूर्ण कर्ज माफ होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, कर्जमाफीचा अध्यादेश निघाल्यावर त्यांची घोर निराशा झाली. एकरकमी कर्जफेड केली, तरच फक्त दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होईल, 2012 पूर्वीचे कर्ज या योजनेत समाविष्ट नाही. यासारख्या जाचक अटी अध्यादेशात असल्याने जाधव यांची निराशा झाली. त्यांचे कर्ज 2012 पूर्वीचे असल्याने त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नव्हता. या निराशेतून त्यांनी गेल्या गुरुवारी (ता. 29) सायंकाळी चारच्या सुमारास द्राक्षबागेत विषारी औषध प्राशन केले होते. उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.