साश्रु नयनांनी भीष्मराज बाम यांना अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

क्रीडामानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ क्रीडा संघटक, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांच्यावर आज पंचवटीतील अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातर्फे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

नाशिक - क्रीडामानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ क्रीडा संघटक, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांच्यावर आज पंचवटीतील अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातर्फे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले. साश्रु नयनांनी भीष्मराज बाम यांना निरोप देतांना उपस्थित क्रीडाप्रेमी,आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हुंदका फुटला. तत्पूर्वी अंत्यदर्शनासाठी भीष्मराज बाम यांचे पार्थिव महात्मानगर मैदानाजवळील वाचनालयात ठेवण्यात आले होते.

सकाळी आठपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महात्मानगर मैदानाकडे धाव घेतली. महापौर रंजना भानसी, स्वाध्याय परीवाराच्या धनश्री तळवलकर,आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, दिपाली देशपांडे यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. बाम यांचे अत्यंदर्शन घेत आदरांजली वाहण्यात आली. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. सकाळी साडे अकराला भीष्मराज बाम यांच्या पार्थिवावर पंचवटीतील अमरधाम येथे अंत्यंसंस्कार करण्यात आले. गीतेतील पंधरावा अध्याय पुरूषोत्तम योगचे वाचन यावेळी झाले. विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्‍त रवींद्र सिंगल यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. तर चिरंजीव सनदी लेखापाल अभिजित बाम यांनी अग्निडाग दिला.

आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, जयंत जाधव, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्‍ते केशव उपाध्ये, डॉ.विनायक गोविलकर, ऑलिंम्पिकपटू कविता राउत, साईचे प्रशिक्षक विजयेंद्र सिंग, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंग विरदी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सचीन जोशी, उद्योजक धनंजय बेळे, नगरसेविका डॉ.हेमलता पाटील, योगेश हिरे, विजय साने, बांधकाम व्यावसायिक जितूभाई ठक्‍कर, सावानाचे डॉ.शंकर बोऱ्हाडे, दादर येथील समर्थ व्यायामशाळेचे उदय देशपांडे, मल्लखांब संघटनेचे प्रदेश सचिव श्रेयस्‌ म्हस्कर, अविनाश धर्माधिकारी, पुण्यातील डेरवनचे हरीष करमरकर, रॅम विजेते डॉ.महेंद्र महाजन, व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासह सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा प्रेमी व खेळाडू उपस्थित होते. माजी उपमहापौर ऍड. मनीष बस्ते यांनी प्रारंभी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. स्वाध्याय परीवारातर्फे श्री.मोराणकर, सुजाण नागरीक मंचातर्फे श्री.देशपांडे यांनी यांनी श्रद्धांजली वाहिली.

आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत
बाम सर आपल्या प्रत्येकाच्या विचारात, कृतीत जीवंत आहेत. मला मिळणाऱ्या प्रत्येक पदकात त्यांच्या चेहरा दिसतो. शुन्यातून त्यांनीच मला व माझ्यासारख्या अन्य खेळाडूंना वर आणले. त्यांनी लावलेली शिस्त, संस्कार पुढे जोपासणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरले.

■ केशव उपाध्ये (प्रवक्‍ते,भाजप)
प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास बाम सर यांचा असायचा. कुठल्याही विषयाशी निगडीत संदर्भ त्यांच्याकडून मिळायचे. थक्‍क करणाऱ्या व्यक्‍तीमत्वाच्या निधनाने पुढच्या पिढीचे नुकसान झाले आहे.

आमदार बाळासाहेब सानप
भीष्मराज बाम यांनी अनेक खेळाडू घडविले. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून त्यांच्याशी संपर्कात असतांना जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या नावाने क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

आमदार जयंत जाधव
भीष्मराज बाम यांनी अनेकांच्या मनावर, आयुष्यावर अधिराज्य गाजविले. शेवटच्या क्षणापर्यंत सामाजिक योगदान देत राहिले. त्यांच्या जाण्याने मोठा आघात झाला आहे.

विजयेंद्र सिंग 'साई'चे प्रशिक्षक
परदेशात देशाचे राष्ट्रगीत वाजविणाऱ्या खेळाडूने मला भेटावे, असा भीष्मराज बाम यांचा आग्रह राहायचा. ऑलिंम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांत नाशिकच्या खेळाडूंनी पदक मिळवावे, अशी त्यांची नेहमी इच्छा होती. ही इच्छा पुर्ण करणे हीच श्रद्धांजली ठरेल.

अविनाश धर्माधिकारी
खेळासह जीवनात बाम सरांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामातून छाप पाडली. त्यांच्या सुचनेप्रमाणे गुणवत्ता व नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेत राहणे, हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल.

■ आमदार सीमा हिरे
भीष्मराज बाम हे नाशिक शहराचे वैभव होते. क्रीडा क्षेत्रातील भीष्माचार्याच्या जाण्याने पुढील पिढीची हाणी झालेली आहे.

हरीष बैजल
माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रमाणेच भीष्मराज बाम यांनीही अंतीम श्‍वास आपल्या आवड असलेल्या क्षेत्रात योगदान देत असतांनाच निधन झाले. त्यांनी दिलेले योगदान कायमस्वरूपी लक्षात राहिल.

■ नगरसेविका डॉ.हेमलता पाटील
भीष्मराज बाम यांच्यासारख्या कर्मयोगी व्यक्‍तीमत्वाकडून प्रत्येकाने काही तरी शिकण्यासारखे होते. त्यांच्या जाण्याने नाशिकची नव्हे तर देशाची अपरिमित हानी झालेली आहे.

आज श्रद्धांजली सभा
क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या (ता.14) सायंकाळी साडे सहाला महात्मा नगर मैदानावर श्रद्धांजली सभा होणार आहे.