बिबट्याचे हल्ले थांबता थांबेना! ; वन विभागाने ठेवले पिंजरे 

leopard attacks in nehunebare taluka chalisgaon
leopard attacks in nehunebare taluka chalisgaon

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - गिरणा परिसरात पशुधनावर सुरू असलेले बिबट्याचे हल्ले थांबता थांबत नसल्याने पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे. वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) गावात बिबट्याने एका वासरासह पारडूचा फडशा पाडला. गुरांवर हल्ले करणारा बिबट्या अद्यापही मोकाटच असल्याने वन विभागाने त्याला पकडण्यासाठी आज पुन्हा दोन ठिकाणी पिंजरे ठेवले. 

रहिपुरी व बहाळ परिसरातील घटनेला 48 तास होत नाही, तोच पुन्हा बिबट्याने आपला पशुसंहार सुरू केला आहे. सुमारे महिन्यापासून बिबट्याने पशुपालकांना अक्षरशः रडकुंडीला आणले आहे. वडगाव लांबे येथील लुभान देवसिंग पाटील या शेतकऱ्याच्या एका वर्षाच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला.

आज सकाळी लुभान पाटील नेहमीप्रमाणे दूध काढण्याकरिता शेताकडे गेले असता, त्यांना वासराच्या मानेचा भाग तसेच पोटाच्या भाग खाल्लेला दिसला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच मानसिंग पाटील व सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांना ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी तहसीलदार कैलास देवरे यांच्यासह वन विभागाला कळविले. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी येत नाही तोच पुन्हा त्याच ठिकाणी शेजारी शेत असलेल्या लुभान मोहन पाटील यांच्या शेतात बिबट्याने पारडूवर हल्ला केल्याचे आढळून आले. पारडूच्या मानेच्या भागाचे लचके बिबट्याने तोडले. एकाच दिवशी दोन गुरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. 

घटनास्थळी पंचनामा -
वडगाव लांबे येथे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे, प्रकाश पाटील, प्रवीण गवारे, राहुल पाटील, अजय महिरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. या ठिकाणी जामनेर व पारोळा येथून तातडीने दोन पिंजरे मागवून ठेवण्यात आले. सध्या या भागात पाच पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याचा नेमका अधिवास लक्षात यावा, यासाठी 'ट्रॅप कॅमेरे' देखील बसविण्यात येणार आहेत. बिबट हा कोणत्या दिशेने येतो व जातो हे या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्षात येईल, असे श्री. मोरे यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळाजवळ बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने हे हल्ले बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना किंवा काम करताना एकटे न करता समूहाने करावे व सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. 

पिंपळवाड म्हाळसा येथे वारसावर हल्ला -
पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) शिवारातही बिबट्याने दोन दिवसांपूर्वी शेळ्यांचा फडशा पाडला होता. आज पुन्हा सकाळी आडगाव रस्त्यालगत शेत असलेल्या जयवंत देवकर यांच्या शेतातील वासराचे पोट फोडून मानेचा भागाला बिबट्याचे दात लागल्याचे श्री. देवकर यांना आढळून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता, हा हल्ला बिबट्याचा नसल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. मात्र, तरीही या भागातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

वडगाव लांबे परिसरात विशेषतः शेतांमध्ये लहान गुरे बांधू नये. हल्ला करणारा बिबट साधारणतः दोन वर्षांचा असावा. शेतात काम करताना येता जाता मोबाईलवर गाणे सुरू ठेवावे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जास्तीचे पिंजरे ठेवले असून ग्रामस्थांनी वन विभागाला सहकार्य करावे. 
- संजय मोरे, वन परिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com