चिमुरडीच्या रडण्याने पाझरली खाकीतील माणुसकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

मनोरुग्ण मातेने रिक्षात सोडली लाडली; पोलिसांकडून सेवासुश्रुषा

मनोरुग्ण मातेने रिक्षात सोडली लाडली; पोलिसांकडून सेवासुश्रुषा

जळगाव - शहरातील चित्रा चौकातील रिक्षाथांब्यावर एक माता तिच्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला रिक्षात बेवारस स्थितीत सोडते... रिक्षाचालक त्या बाळाला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठतो... भुकेने व्याकूळ चिमुरडी टाहो फोडत रडते... अन्‌ ठाण्यातील कुणी कर्मचारी तिला दूध पाजतो, कुणी खेळवण्याचा प्रयत्न करतो... तर कुणी जवळ घेत शांत करतो... कुणी परिसरातील दत्तमंदिरात जाऊन प्रार्थना करतो, तर महिला अधिकारीही त्या चिमुरडीला मायेची ऊब देत शांत करण्याचा प्रयत्न करतात... ‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन घडविणारे हे दृश्‍य आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिसले. चार तास शोध घेतल्यानंतर या बाळाला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. 

 

शहरातील चित्रा चौकात पावणे बारा वाजेच्या सुमारास प्रवासी भरण्यासाठी सागर सोनवणे, यशवंत पाटील थांब्यावर रिक्षा घेऊन उभे असतांना एक अनोळखी महिला सहा महिन्यांच्या मुलीला रिक्षेत सोडून निघून गेली. रिक्षाचालकांनी शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. शहर पोलिस ठाण्यात नेल्यानंतर हद्द नसल्याचे सांगत रिक्षाचालकास जिल्हापेठला पाठविण्यात आले. येथे आल्यावर उपनिरीक्षक सुप्रीया देशमुख यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना त्याच्या आईचा शोध घेण्यास पाठवले. मात्र भूकेने व्याकूळ झालेल्या मुलीचे रंडणे थांबतच नसल्याने अगोदर कर्मचारी नाना तायडे, शेखर पाटील, शिवाजी धुमाळ यांनी तिला शक्‍यते सर्व प्रयत्न केले. अखेर तिला दुधाची बाटली आणून दूध पाजण्यात आले. तरी बाळ शांत होत नाही म्हणून एकाने कडेवर घेत तिला दुचाकीवर रपेट मारुन आणली. तीन तास या बाळाने पोलिसांना घाम फोडला.

 

आई मनोरुग्ण...!

जिल्हापेठ पोलिसांनी तीन- चार तास भटकंती करीत मुलीच्या नातेवाईकांचा शोध लावण्यात यश मिळवले, पिंप्राळा हुडको येथील रहिवासी विमल मोहन सोनवणे (वय-२५) या महिलेने ते बाळ रिक्षात सोडल्याचे निष्पन्न झाले, तिच्या पतीसह नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. चौकशी केल्यावर मुलीची आई मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली. सकाळी पतीसोबत वाद घालून ती मुलीला घेऊन निघून गेल्याचे कुटूंबीयांनी सांगितले.