अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी बहीण-भावाची लूट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पैशाच्या वादातून गोंधळ; जिल्हा रुग्णालयात दलालांचा उच्छाद
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्मचारी असल्याचे भासवून अपंगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हजार रुपये उकळल्यानंतर अतिरिक्त पैसे मागितल्याने वाद झाला. दारूच्या नशेतील दोघा दलालांनी शिवीगाळ करीत कागदपत्रांच्या सत्यप्रती पळविल्याने गोंधळ उडाला. ड्यूटीवर हजर शनिपेठच्या पोलिस कर्मचाऱ्याने संशयिताला पकडून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले, मात्र दोघांतर्फे पोलिसांत तक्रार होऊ नये यासाठी विनवण्या सुरू होत्या.

जिल्हा सामान्य रुग्णालयात एका अपंग तरुणीला शिवीगाळ केल्याचे प्रकरण संध्याकाळी पाचच्या सुमारास घडले. किनगाव (ता. यावल) येथील पुरुषोत्तम हिरामण धनगर बहिणीसह शालेय उपयोगासाठी आवश्‍यक अपंगत्वाचा दाखला नूतनीकरण करण्यासाठी मंगळवारी जिल्हा रुग्णालयात आले होते. जिल्हा रुग्णालय आवारातच फिरणाऱ्या संजय मधुकर दांडगे, संतोष मधुकर दांडगे व गुड्डू पाटील यांनी त्यांना हेरून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे भासवत हजार रुपयांत काम करून देतो, असे सांगत पैसे उकळले. मंगळवारी (ता.७) दाखला तयार ठेवतो असे सांगून एक हजार रुपये आगाऊ घेतले. मात्र आज दाखला घेण्यासाठी आलेल्या दोघा बहीण-भावास दाखला अजून तयार झाला नाही, आणखी पैसे द्यावे लागतील असे म्हणत वाद घातला. सर्व पैसे अगोदरच दिले आहे, आता पैसे नाही असे सांगितल्यावर वाद होऊन तिघांनी शिवीगाळ करीत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. ड्यूटीवर हजर शनिपेठ पोलिस कर्मचारी अन्वर तडवी यांनी तत्काळ तिघांपैकी संजय दांडगे याला ताब्यात घेत, जिल्हापेठ पोलिसांत घटना कळवली. 

तक्रार नको म्हणून विनवण्या
पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या धनगर यांना गाठून दलालांच्या चमूने विनवण्या करीत तक्रार न करण्याची मागणी केली. आम्ही पैसे देतो, असे सांगितले. तसेच या अपंग मुलीचे मूळ दस्तऐवज घेतलेले परत देण्याचे सांगत गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू होते. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिसांत मात्र कुठलाही गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

कर्मचाऱ्याची मुले
जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात कर्मचारी निवासस्थानात वास्तव्याला असलेले दोघे कर्मचाऱ्यांची मुले आहेत, इतरही भावबंध जिल्हा रुग्णालयात कामासाठी, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आर्थिक लूट करण्यासाठी दलाली करीत असल्याचे उघड झाले असून यावर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन, शल्यचिकित्सक किंवा कुठलीही यंत्रणा आजवर ठोस उपाययोजना करून शकली नाही.