Mahendra Mahajan's detailed article about Nandur-Mandur village
Mahendra Mahajan's detailed article about Nandur-Mandur village

नांदूर-मानूरचा शेतकरीराजा झाला व्यापारामध्ये पारंगत

मुंबई-आग्रा आणि औरंगाबाद महामार्ग असे दळणवळणाचे सशक्त कोंदण लाभलेल्या नांदूर-मानूरचा महापालिकेत समावेश होण्याअगोदर माडसांगवी गटग्रामपंचायतीत समावेश होता. महापालिकेत या भागाचा समावेश झाल्यावर नांदूर-मानूरसाठी स्वतंत्र विविध कार्यकारी सहकारी संस्था करण्यासाठी मधुकर निमसे आणि कारभारी निमसे यांनी केलेले प्रयत्न फलद्रूप झाले. तसेच घरटी द्राक्षबाग आणि जनावरांचा घास अशी शेती केली जात असे. भोकरी, अनामशाही, काळी साहबी या बियांच्या वाणाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे पहिल्या विकास आराखड्यातून पिवळ्या पट्ट्याऐवजी हिरवा पट्टा कायम राहावा म्हणून बाबूराव निमसे, आबासाहेब क्षेमकल्याणी, के. एस. निमसे, मधुकर निमसे, रामचंद्र पाटील निमसे या धुरीणांनी प्रयत्न केले. मंत्रालयातून त्या वेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा नांदूरचे शंभर, तर मानूरचे पन्नास टक्के क्षेत्र पिवळ्या पट्ट्यात समाविष्ट झाल्याने आता सगळे "ले-आउट' होतील असे दिसते. परिवर्तनाच्या या टप्प्यात आता शेतकरीराजा व्यापारउदिमामध्ये पारंगत झालाय. त्याबाबत...

माळोदे, हामरे, अनवट आणि आदिवासी कुटुंबीयांची तेराशेच्या आसपास लोकवस्ती मानूरमध्ये आहे. नांदूरमध्ये निमसे, दिंडे, आदिवासी आणि दलित बांधवांची वस्ती आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मूळ निवासींची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास असून, गुंठेवारीमुळे शिवारातील रहिवाशांची संख्या सात हजारांपर्यंत पोचली आहे. जनार्दननगर, निसर्गनगर, समर्थनगर, जाकीनगर, मराठानगर या भागामध्ये पूर्वी दहा हजार रुपयांना गुंठा विकला गेला. आता गुंठ्याचा भाव नऊ लाखांपर्यंत पोचला आहे. मानूरमध्ये अळूचे बारमाही उत्पादन घेतले जाते. स्प्रिंकलरच्या सहाय्याने अळू फुलविले जाते. द्राक्षे, भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी घेतात. नांदूरमध्ये शेती उत्पादनाची हीच स्थिती आहे. दोन्ही शिवारांमध्ये सर्वसाधारणपणे 900 हेक्‍टरच्या आसपास क्षेत्र आहे. मानूरमधील 60 टक्‍क्‍यांपर्यंत लोक दुकाने, हॉटेल्स अशा व्यवसायाकडे वळले असून, कुटुंबातील एकजण नोकरी करतो आहे.

महामार्ग फुललाय व्यवसायाने
हॉटेल्स, ढाबे, वाहन बाजार, मार्बल दुकाने, लॉन्सने महामार्गाचा परिसर फुलला आहे. निमसेंच्या कुटुंबातील तरुण नातेवाईक महिन्याला पाचशे रुपयांच्या वाहन बाजारात कामाला होता. सात वर्षांपूर्वी निमसेंनी त्याला जय जनार्दन वाहन बाजार सुरू करून दिला. बघता-बघता नांदूर-मानूर शिवारामध्ये 22 वाहन बाजार उभे राहिले. याशिवाय नाशिक-नाशिक रोडमध्ये मते, उत्सव, राजराजेश्‍वरी, सेलिब्रेशन अशी मोजकी लॉन्स असताना 18 वर्षांपूर्वी याच भागात लॉन्स उभारण्यात आली. त्या वेळी खेड्यात कोण लग्नाला येईल, अशी साशंकता स्थानिकांमध्ये होती. मात्र एकामागून एक होत गेलेल्या लॉन्सला मिळणाऱ्या प्रतिसादामधून शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून लॉन्स व्यवसाय मिळाला. 25 लॉन्सची उभारणी झाली आहे. विशेष म्हणजे, मखमलाबादचे दोन शेतकरी आणि दोन निवृत्त अधिकारी यांचा अपवाद वगळता इतर लॉन्स शेतकऱ्यांनी उभारले असून, त्याचे व्यवस्थापन शेतकरी करताहेत. याखेरीज वाहनांसाठी पूरक व्यवसायाच्या जोडीलाच सर्व्हिस स्टेशनची संख्या वाढत चालली आहे. शेतीला आता आधार उरलेला नसताना शहरालगत पिवळ्या पट्ट्याचे क्षेत्र वाढल्याने जमिनीला मोल वाढले आहे. पर्यायाने शेतकऱ्यांची इतर व्यवसायाला अधिक पसंती मिळू लागली आहे. पहिले परफेक्‍ट खासगी कृषी मार्केट नांदूर शिवारात उभे राहिले. त्या माध्यमातून शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था होत असतानाच रोजगारनिर्मितीला हातभार लागला आहे.

मलनिस्सारणाचे की प्रदूषणाचे केंद्र?
गोदावरीलगत टाकळी शिवारात मलनिस्सारण केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे गोदावरीमध्ये थेट गटारीच्या मिसळणाऱ्या पाण्यापासून मुक्ती मिळाल्याची भावना स्थानिकांमध्ये होती. पण हे केंद्र मलनिस्सारणाचे की प्रदूषणाचे आहे, असा थेट सवाल नांदूर-मानूरवासीय उपस्थित करताहेत. या भागातील तरुण शेतकऱ्यांच्या तक्रारी टोकदार बनल्या आहेत. गोदावरीमधून पाणी वाहत असताना केंद्रातील पाणी थेट सोडले जाते. त्यामुळे जगणे मुश्‍कील झाले आहे. हे कमी काय म्हणून प्रदूषित पाण्यावर शेती कशी करायची, असाही प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. रात्री दुर्गंधीला तोंड द्यावे लागत असतानाच घोंघावणाऱ्या डासांनी झोप मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. या समस्येकडे दुर्लक्ष कायम राहिल्यास मग मात्र मोठे आंदोलन उभे राहील, असा इशारा द्यायला शेतकरी मागे-पुढे पाहत नाहीत.

महापालिकेत नांदूर-मानूरचा समावेश झाल्यानंतरही पायाभूत सुविधांची वानवा कायम होती. उघड्या गटारी, कच्चे रस्ते होते. पूर्वी नाशिक रोडहून येताना जनार्दन स्वामी पूल नसल्याने नदीतून यावे लागायचे. नाल्याला पूर आला, की महापालिकेची शाळा बंद ठेवावी लागायची. मानूरच्या बोळीच्या नाल्याला पाणी असल्यावर बाजेवरून रुग्णांना रस्त्यावर आणावे लागायचे. ही परिस्थिती आठवली, तरीही अजूनही स्थानिकांच्या अंगावर काटे उभे राहतात. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कृष्णकांत भोगे यांना स्थानिक 35 शेतकऱ्यांनी उभारलेल्या प्रीकूलिंग-कोल्ड स्टोअरेजमधील द्राक्षांचा पहिला कंटेनर पाठविण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्या वेळी श्री. भोगे यांनी द्राक्ष उत्पादनापासून मार्केटिंगची माहिती जाणून घेतली आणि स्थानिकांना कशाची गरज आहे हे जाणून घेतले. कौलारू शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय नसल्याचे ऐकल्यावर त्यांनी शाळा उभारण्यासाठी सहकार्य केले. महादेव मंदिरासमोर असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात नाहीत. गोदावरीच्या खडकावर पार्थिव ठेवून अंत्यसंस्कार केले जातात, ही माहिती मिळाल्यावर श्री. भोगे यांनी स्वतः स्थानिक परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांनी स्मशानभूमीच्या कामासाठी सहकार्य केले. रस्त्यांच्या कामांसाठी भावबंदकीमधील वाद मिटवावे लागले आहेत. अशा नांदूर-मानूरचे रुपडे पालटले असले, तरीही काळाच्या ओघात तयार झालेल्या प्रश्‍नांचे उत्तर शोधायला हवे, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

आणखी हवंय...

  • क्रीडासंकुल, तरण तलाव, नाट्यगृहांची उभारणी करणे गरजेचे आहे. त्यातून नागरीकरणामध्ये आवश्‍यक बनलेल्या गरजांसाठी 15 किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार नाही.
  • माडसांगवीला असलेल्या टपाल कार्यालयामुळे टपाल पोचण्यासाठी विलंब होतो. धनादेशाचे पाकीट वेळेवर मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी टपाल कार्यालय व्हायला हवे.
  • महामार्गावरून गावांतर्गत एसटी बस यायची झाल्यास त्यासाठी रस्त्यांची आवश्‍यकता आहे. म्हणूनच रस्त्यांचे रुंदीकरण अत्यंत आवश्‍यक बनले आहे.
  • कमी दाबाने येणाऱ्या पाण्याच्या समस्येचे निराकारण व्हायला हवे. तसेच डास आणि वासमुक्तीचे अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • मळ्यांमध्ये गटारींची सोय करत असतानाच निलगिरी बाग भागामध्ये क्रीडांगण साकारण्याचा विचार व्हायला हवा. तरुणाईमध्ये आरोग्यसंपदेचा संस्कार रुजविण्यासाठी जिम उभारावेत.
  • नांदूर गावठाणातील ओटे रस्त्यापर्यंत पोचले आहेत. व्यापारी संकुलासाठी वाहनतळाची सोय नाही. या दोन्ही प्रश्‍नांचे निराकरण व्हायला हवे.

जमिनींवरील आरक्षणातून अर्धा एकर, एक एकरवर उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या भागाला वगळायला हवे. तसेच गुंठेवारीच्या क्षेत्रात वाढलेल्या नागरी वस्त्यांना शहरीकरणातील सुविधा मिळायला हव्यात. नांदूर-मानूरच्या नागरिकांना समतोल विकासाची प्रचीती येण्याची आवश्‍यकता आहे.
-सुनीता निमसे, माजी नगरसेविका

महापालिका क्षेत्रासाठी लोकसंख्या पुरेशी असावी म्हणून खेड्यांचा समावेश झाला. त्या वेळी नाशिकचा विकास काही प्रमाणात झाला होता. मात्र त्या तुलनेत खेड्यांचा विकास झालेला नव्हता. पुढे टप्प्याटप्प्याने विकास करतो, असे सांगण्यात आले होते. पण कर सारख्या प्रमाणात घेतला जात असला, तरीही नागरी सुविधा पुरेशा नाहीत. बाजारमूल्य दरामुळे व्यवहार थंडावले आहेत. विकास आराखडा मुळातच दोन वर्षांपूर्वी यायला हवा होता. पण त्याच्या अंमलबजावणीचे अद्याप चित्र स्पष्ट झाले नसल्याने विकासाची कामे थांबली आहेत.
-कारभारी निमसे, ज्येष्ठ नेते

नांदूरमधील नदीकाठच्या मळ्यांसाठीच्या रस्त्यांचा प्रश्‍न सुटायला हवा. मळ्यांसाठी झालेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आवश्‍यक आहे. नांदूर शिवारात उद्याने, क्रीडांगणाचा विकास व्हायला हवा. स्वच्छतेकडे स्थानिकांचा कल असून, मध्यंतरी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह दीडशे शेतकऱ्यांनी गोदावरी नदीची साफसफाई केली होती. स्थानिकांचा उत्साह पाहून गोदावरीचा प्रदूषणाचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघायला हवा.
-केशवराव निमसे, शेतकरी

पंधरा वर्षांपूर्वी आम्ही गोदावरीमधील पाणी प्यायचो. पण आता हातात पाणी घ्यावे असे वाटत नाही. नदीमध्ये पाणवेली वाढून डासांचा प्रश्‍न तयार होऊ नये यास प्राधान्य मिळावे. त्याचबरोबर नांदूरला गोदावरीमध्ये पाण्याचा साठा करत बोटिंग क्‍लब सुरू करावे. मानूर फाटा आणि नांदूर नाका भागातील ऐतिहासिक बारवेभोवती संरक्षक कठडे उभारून बारव स्वच्छ करत त्यातील पाण्याच्या वापर करावयास हवा.
-किरण निमसे, शेतकरी

महापालिका आर्थिक अडचणीत असल्याने औरंगाबाद आणि जुना आग्रा महामार्गाचा भाग महापालिकेने हस्तांतरित करून घेऊ नये. तसे घडल्यास महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय नांदूर नाका भागात सुलभ शौचालयाची व्यवस्था करत विशेषतः महिलांची कुचंबणा थांबविणे आवश्‍यक आहे.
-भूषण शिंदे, व्यावसायिक

मानूर भागामध्ये रस्ते, पाणी, विजेची सुविधा उपलब्ध आहे. पण विकास आराखड्यातून शिवारातील अर्धा भाग वगळला गेला आहे. पूर्ण भाग विकास आराखड्यात समाविष्ट करावा ही मागणी कायम आहे. मागणी मान्य होणार नसल्यास आमचा भाग महापालिका क्षेत्रातून वगळला तरी चालेल. नांदूर-मानूर सोसायटीचे सभासद शेतकरी 700 पर्यंत असून, 400 कर्जदार आहेत. वर्षाला तीन कोटींच्या कर्जाचे वाटप होते. पण जिल्हा बॅंकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
-सोमनाथ हामरे, माजी अध्यक्ष, नांदूर-मानूर सोसायटी

विकास कशाला म्हणतात, हे पाहायचे असल्यास नक्कीच नांदूर-मानूर भागाला भेट द्यावयास हवी. कुंभमेळ्यानिमित्त या भागातील रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागला. शेतकरी स्वतः जमीन कसताहेत. कुणीही शेती विकू नये यासाठीचा आग्रह कायम आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः व्यापारी व्हावे यादृष्टीने प्रयत्न केले जातील.
-उद्धव निमसे, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com