बहुमतापाठोपाठ जबाबदारीही पेलायचीय! 

बहुमतापाठोपाठ जबाबदारीही पेलायचीय! 

नाशिक - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 15 मार्चला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होईल व त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेमधील कारभाराला सुरवात होईल. त्यानंतर स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या निवडणुका होतील. 2002 मध्ये भाजप व शिवसेना मिळून बहुमतात सत्ता आली होती; परंतु एक पक्ष म्हणून नाशिककरांनी भाजपला प्रथमच महापालिकेच्या इतिहासात 66 जागा निवडून, बहुमताच्या पार नेऊन ठेवले आहे. त्यामुळे आघाड्यांच्या राजकारणाबरोबरच आर्थिक उलाढालींनाही आपोआप ब्रेक लागला आहे. नाशिककरांच्या बहुमताने एकहाती सत्तेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी दुसरीकडे भाजपची जबाबदारीदेखील वाढली आहे. आगामी काळात भाजपला यशाचे वातावरण टिकवून ठेवायचे असेल तर शहरातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. 

भाजपपुढील आव्हाने 
- वाहतूक कोंडीच्या समस्येवर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी लागेल 
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरणासाठी बससेवा सुरू करणे 
- गोदावरी स्वच्छतेसाठी नदीत मिसळणारे नाले बुजवणे 
- सिंहस्थ कुंभमेळ्यात बांधलेल्या गोदाघाटांचे संवर्धन 
- घंटागाड्यांमध्ये नियमितता 
- सुरळीत पाणीपुरवठा 
- रुग्णालयांमध्ये औषधांची उपलब्धता 
- बंद पथदीप सुरू करणे 
- अतिक्रमण मोहिमा नियमित सुरू ठेवणे 
- औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे 
- मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतेत वाढ करणे 
- काझी गढीला संरक्षक भिंत बांधणे 

मनसेच्या कामांचे पालकत्व 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकाळात सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचे पालकत्व आता सत्तांतरानंतर भाजपकडे आले आहे. रिलायन्स समूहातर्फे उभारण्यात आलेले गोदापार्क, टाटा ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेले वनौषधी उद्यान, एल ऍण्ड टी कंपनीच्या माध्यमातून उड्डाणपुलाखाली सुरू असलेले सुशोभीकरण, ऐतिहासिक संग्रहालय, शंभर फुटी रंगीत कारंजा आदी विकास प्रकल्प पुढे चांगल्या पद्धतीने चालावेत, यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com