नोकरदार, प्रस्थापित बनले "रोहयो' मजूर 

नोकरदार, प्रस्थापित बनले "रोहयो' मजूर 

नोकरदार, प्रस्थापित बनले "रोहयो' मजूर 

जळगाव : शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी, प्रस्थापित राजकारणी, सहकारी संस्थांमध्ये संचालक असलेल्या व्यक्तींना थेट मजूर दाखवून रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "रोहयो'तील कामांच्या ऑनलाइन माहितीवरून चोपडा तालुक्‍यातील हा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

चोपडा तालुक्‍यातील खडगाव येथील रहिवासी व माहिती अधिकार कार्यकर्ते मुरलीधर ताराचंद पाटील यांनी रोजगार हमी योजनेत कशाप्रकारे गैरव्यवहार चालतो, याची माहिती "ऑनलाइन' विवरणातून उपलब्ध केली आहे, त्यातून हे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. 

धक्कादायक प्रकार 
मुरलीधर पाटील यांच्या हाती लागलेल्या माहितीत "मनरेगा' रोजगार सेवक गोपाल प्रेमचंद बिऱ्हाडे हे एका शैक्षणिक संस्थेत शिपाई असताना एकाच दिवशी ते संस्थेत आणि रोजगार हमीच्या योजनेच्या कामावरही हजर होते. एवढेच नव्हे, तर ते ग्रामपंचायतीत सचिव म्हणूनही कार्यरत असल्याचे समोर आले आहे. 
सोबतच तत्कालीन सरपंच श्रीमती वेणूबाई भास्कर भिल यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत उपसरपंच सुदर्शन सुरेश पाटील याने सरपंच वेणूबाईंनाच रोजगार हमीतील मजूर दाखविले आहे. सुदर्शन हा कॉंग्रेसचे चोपडा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांचा मुलगा आहे. सुदर्शनने त्याचा भाऊ किरणच्या नावानेही "रोहयो'चे जॉब कार्ड भरले असून, त्यात आईचे वय 67 असताना 40 वर्षे तर वडिलांचे वय 50 वर्षे दाखविले आहे. विशेष म्हणजे किरणचे वयही 40 असल्याचे दिसत आहे. याचा अर्थ आई आणि मुलाचे वय सारखेच कसे, असा प्रश्‍नही यातून उपस्थित होतो. विशेष म्हणजे किरण सुरेश पाटील हादेखील शैक्षणिक संस्थेत लिपिक पदावर अंशकालीन कर्मचारी असून, एकाचवेळी तो महाविद्यालयात आणि "रोहयो'च्या कामावरही हजर असल्याचे माहितीवरून दिसून येते. 

कामांमध्येही गैरव्यवहार 
"रोहयो'च्या माध्यमातून गावात होणाऱ्या कामांमध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व प्रकरणांत ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता ती अद्यापपर्यंत मिळाली नाही. तहसीलदारांपर्यंत प्रकरण गेल्यानंतरही चौकशी झालेली नाही. म्हणून मुरलीधर पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com