रणरणत्या उन्हात मालेगाव महापालिकेचा रणसंग्राम 

रणरणत्या उन्हात मालेगाव महापालिकेचा रणसंग्राम 

मालेगाव - एप्रिलच्या रणरणत्या उन्हात मालेगाव, भिवंडी-निजामपूर, लातूर, परभणी, चंद्रपूरसह नवनिर्मित पनवेल या सहा महापालिकांचा रणसंग्राम सुरू होत आहे. येथील महापौरपद सर्वसाधारण आरक्षित झाल्याने मातब्बरांच्या सहभागाने निवडणूक रंगणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत जाहीर झाल्यानंतर एकाच प्रभागातून चार सदस्य निवडीसाठी होणारी ही पहिली निवडणूक असेल. प्रभागातील पॅनल तगडे असावे यासाठी मातब्बरांनी व्यूहरचना सुरू केली आहे. 

राज्यासह मालेगाव तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याने स्थानिक भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पश्‍चिम भागात यामुळे शिवसेना-भाजप संघर्ष अधिक टोकदार होईल. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना भाजपचे युवानेते अद्वय हिरे व महानगराध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या समर्थकांशी कडवा मुकाबला करावा लागणार आहे. राज्यातील निवडणुकीतील यशामुळे भाजपतर्फे इच्छुक असलेल्यांचे मनोबल वाढले. त्या तुलनेत शिवसेनेतील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यांना बळ देतानाच पश्‍चिम भागातील वर्चस्व कायम राखण्यासाठी श्री. भुसे यांचा कस लागेल. याउलट मावळत्या महापालिकेत भाजपचा अधिकृत एकही सदस्य नाही. मालेगाव विकास आघाडीचे सुनील गायकवाड यांच्यासह चारही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला ज्या काही जागा मिळतील त्या सरप्लसच असतील. याउलट शिवसेनेला सध्या आहे ती सदस्यसंख्या राखण्यासाठी झगडावे लागेल. 

पूर्व भागात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनता दल व एमआयएम असा बहुरंगी मुकाबला होईल. यात आमदार आसिफ शेख, त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, एमआयएमचे मलिक युनूस इसा, जनता दलाचे बुलंद एकबाल यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. महापालिकेत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत तिसऱ्या आघाडीची सत्ता आहे. सत्ता कायम राखण्यासाठी मौलाना मुफ्ती यांना झगडावे लागेल. शहरातील एकंदर परिस्थिती पाहता महापालिका निर्मितीनंतर झालेली 2002 ची पहिली सार्वत्रिक निवडणूक वगळता कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. प्रत्येक वेळी महापौर निवडणुकीत अन्य पक्ष, आघाडी व अपक्षांच्या मदतीने सत्ता काबीज करावी लागते. शहरात भागनिहाय स्थानिक नेत्यांचे वर्चस्व आहे. यामुळे या वेळीही हीच परिस्थिती कायम राहील. या पार्श्‍वभूमीवर येथील घोडेबाजार सतत तेजीत असतो. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्व भागात 25 पेक्षा अधिक जागा मिळवून सत्ता काबीज करण्याची रणनीती आखली आहे. एकूण 84 नगरसेवकांपैकी 60 नगरसेवक मुस्लिमबहुल भागातून विजयी होतील. 24 नगरसेवकांना हिंदूबहुल भागात संधी असेल. 

स्थानिक आघाड्यांचा प्रयत्न 
शहरात पाच वर्षांत सामाजिक संघटनांचे कामकाज उठावदार झाले आहे. महापालिकेतील गैरव्यवहार, निकृष्ट कामे यावर अंकुश ठेवण्यासाठी हे कार्यकर्ते सतत प्रयत्नशील असतात. प्रत्यक्ष निवडणुकीत अपक्ष म्हणून नशीब आजमावताना या कार्यकर्त्यांच्या पदरी सतत अपयश आले आहे. या वेळी विविध भागातील सामाजिक कार्यकर्ते व पश्‍चिम भागातील पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच डाव्या आघाडीतील काही कार्यकर्ते आपापल्या ताकदीनुसार दोन-तीन प्रभागांत आघाडी करून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. यात पश्‍चिम भागातील माजी उपमहापौर सखाराम घोडके, नरेंद्र सोनवणे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, मनसेचे नगरसेवक गुलाब पगारे, रवींद्र पवार, देवा पाटील, निखिल पवार यांची मालेगाव युवा संघटना वा आम्ही मालेगावकर तसेच पूर्व भागातील रिजवान बॅटरीवाला यांची बद उन्वाणी संघटना अशा स्थानिक आघाड्याही चर्चेत असतील. 

बहुसदस्य प्रभाग अनुभव गाठीशी 
महापालिकानिर्मितीनंतर 2002 मध्ये झालेली पहिली निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची होती. त्या वेळी तीन सदस्यांचा एक प्रभाग होता. मात्र महिला आरक्षण 33 टक्के होते. त्यामुळे दोन पुरुष व एक महिला अशी रचना होती. 30 ऑगस्ट 2016 च्या आदेशानुसार बहुसदस्यीय प्रभागपद्धतीत चार सदस्य असतील. 50 टक्के महिला आरक्षणामुळे दोन पुरुष, दोन महिला अशी प्रत्येक प्रभागाची स्थिती असेल. येथील जुन्या जाणत्या मातब्बरांना तीन सदस्य प्रभागपद्धतीचा अनुभव गाठीशी आहे. त्याचा लाभ मातब्बरांना होईल की नवइच्छुकांना हे पाहणे रंजक ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com