मालेगाव महापालिकेत सत्तासुंदरीसाठी अभद्र युतींचा बाजार 

मालेगाव महापालिकेत सत्तासुंदरीसाठी अभद्र युतींचा बाजार 

मालेगाव - महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (तिसरी आघाडी) व शहर विकास आघाडी युतीची सत्ता आहे. या युतीला शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा आहे. शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तू-तू मैं-मैं सुरू आहे. शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी एमआयएमचा झेंडा हाती घेतला आहे. महापालिकेच्या आजपर्यंतच्या महापौर निवडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला आहे.

या वेळी होणाऱ्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्ष व गट-तट तसेच नेत्यांची पावले ठराविक जागा जिंकून सत्ता हस्तगत करण्याकडे वा किंगमेकर होण्यासाठी पडत आहेत. त्यांचे मनसुबे कुठवर सफल होतात हे या निवडणुकीत दिसेल. महापालिकेत काँग्रेस विरोधी बाकावर आहे. महापौर निवडणुकीत जनता दल व मालेगाव विकास आघाडी काँग्रेससमवेत होती. जनता दलाचे बुलंद एकबाल काँग्रेस व मित्रपक्ष युतीचे उमेदवार होते. त्यांना पराभवाचा झटका बसला. निवडणूक पार पडताच काँग्रेसशी त्यांचा बेबनाव सुरू झाला. यामुळे एकूणच शहरातील सद्यःस्थिती कालचे विरोधक आजचे मित्र व कालचे मित्र आज शत्रू अशी आहे.

शहरात सर्वांत जास्त विकासकामे केल्याचा दावा काँग्रेसतर्फे केला जातो. याउलट काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात अग्रणी असल्याची टीका जनता दलातर्फे होत आहे. प्रचारात जनता दल काँग्रेसचा भ्रष्टाचार व घराणेशाही यावरच भर देणार आहे. जनता दलाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. मालेगाव विकास आघाडीच्या चारही नगरसेवकांनी गटनेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये प्रवेश केला. श्री. गायकवाड भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपला सध्या अच्छे दिन आहेत. मात्र, उमेदवार निश्‍चिती व अन्य किरकोळ धुसफुशीतून श्री. गायकवाड व पक्षाचे युवानेते अद्वय हिरे यांच्यात द्वंद्व सुरू झाले आहे. दोघांचे कार्यकर्ते एकमेकांवर टीकाटिप्पणी करीत आहेत. या दोघा नेत्यांमधील वादाचा इच्छुकांनी धसका घेतला आहे.

शिवसेना पश्‍चिम भागात बऱ्यापैकी वर्चस्व ठेवून आहे. दादा भुसे मंत्रिपदी विराजमान झाल्याने या पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पश्‍चिम भागात पाच प्रभागांत वीस जागा असताना दोनशेपेक्षा अधिक इच्छुक आहेत. यामुळे उमेदवार निश्‍चिती भुसे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे महापालिकेत सत्ता मिळविताना नेत्यांना सतत घोडेबाजार करावा लागला. प्रसंगी पैशांसाठी विविध पक्षांतील एकनिष्ठ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे या वेळी निवडणुकीत इच्छुक बंडखोरीसाठी सज्ज झाले आहेत. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या भूमिकेने सर्वच इच्छुक रणांगणात उतरले आहेत.

नाराजी कशी दूर करणार?
शहरात महापालिका, मामको बॅंक, जनता बॅंक व बाजार समितीतील व्यापारी गट वगळता अन्य ठिकाणी सत्तेच्या फारशा संधी नाहीत. यामुळे महापालिका व मामको बॅंक निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. आता महापालिका निवडणुकीत इच्छुकांना नेते कसे समजावणार? उमेदवारी मिळालेले त्यांची नाराजी कशी दूर करणार? याबाबत उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com