मालेगाव महापालिका निवडणूक लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

मालेगाव - राज्यातील चंद्रपूर, परभणी, लातूर या तीन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या तीन महापालिकांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार असून, २१ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. यामुळे मालेगावसह भिवंडी-निजामपूर व पनवेल या तीन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मेच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होण्याची शक्‍यता आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडल्यावर राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव एन. जे. वागळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील सुधारित कार्यक्रम प्रशासनाला पाठविला आहे. यामुळे आज मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही. मालेगाव महापालिकेला सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्याचे आयुक्त रवींद्र जगताप, सहाय्यक आयुक्त (निवडणूक) राजू खैरनार यांनी सांगितले. सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून ७ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी आज प्रसिद्ध होणार होती. आता मतदान केंद्रांची यादी १२ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येईल. प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १८ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येईल. जुन्या कार्यक्रमानुसार ही यादी २७ मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार होती.

शहरात तीन लाख ९१ हजार ३२० मतदार आहेत. त्यांची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणारी ही पहिली निवडणूक आहे. ७०० ते ८०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र यानुसार ५२० पेक्षा अधिक मतदान केंद्रांची आवश्‍यकता आहे. मतदार यादीवर ऑफलाइन ७८, तर ऑनलाइन २१२ हरकती आल्या. त्याची पडताळणी सुरू आहे. सुधारित कार्यक्रमामुळे अंतिम टप्प्यातील कामकाज लांबणीवर पडले.

Web Title: Malegaon municipal elections postponed