गणेशकुंड, मोसमपात्र शुद्ध करा अन्यथा ‘श्रीं’चे विसर्जन नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मालेगाव - बकरी ईदसाठी महापालिकेने कत्तलखान्यांची व्यवस्था केलेली असताना जनावरांची गल्लीबोळात कत्तल केली जात आहे. त्यामुळे गटारीमधून रक्त व अनावश्‍यक मांसाचे तुकडे मोसम नदीपात्रात येत आहेत. हे रक्‍तमिश्रित पाणी विसर्जनासाठी केलेल्या कुंडात येते. पोलिस, प्रशासन व महापालिका याला जबाबदार आहे. मोसम नदीपात्र व गणेशकुंडाचे तातडीने शुद्धीकरण करावे; अन्यथा विसर्जन केले जाणार नाही. तसेच ५ सप्टेंबरला मालेगाव बंद पुकारला जाईल, असा इशारा भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांनी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला.

मोसम नदीपात्रातील रक्तमिश्रित पाण्यासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी एकता जिमखान्यात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते सुरेश निकम, भाजपचे महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, पवन ठाकरे, हरिप्रसाद गुप्ता, सुनील चौधरी, नाना मराठे, रामदास पवार, श्रीकांत शेवाळे, अशोक बच्छाव उपस्थित होते. श्री. हिरे म्हणाले, की रक्तमिश्रित पाणी व अनावश्‍यक मांसाचे तुकडे नदीपात्रात वाहत आहे. महसूल, पोलिस व महापालिकेच्या भ्रष्ट युतीमुळे अवैध कत्तलखान्यांची संख्या वाढली आहे. या कत्तलखान्यांमध्ये काही नेत्यांची भागीदारी आहे. मोसम नदीपात्र व गणेशकुंडाचे तातडीने शुद्धीकरण करावे. रक्तमिश्रित पाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा; अन्यथा ‘श्री’ विसर्जन केले जाणार नाही. ५ सप्टेंबरला मालेगाव बंदची हाक दिली जाईल. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे मुस्लिम मतांवर डोळा ठेवून या प्रश्‍नाकडे डोळेझाक करीत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर श्री. भुसे आमदार व मंत्री झाले हे ते विसरले, असा आरोपही त्यांनी केला.

श्री. गायकवाड म्हणाले, की रक्तमिश्रित पाण्यामुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रश्‍नाला बगल देऊन दादा भुसे दुटप्पी वागतात. अद्वय हिरे घेतील त्या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा राहील. हरिप्रसाद गुप्ता, सुनील चौधरी, जगदीश गोऱ्हे, पवन ठाकरे, संजय काळे आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री. हिरे व गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह मोसम नदीपात्र, गणेशकुंडाची पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांना निवेदन दिले.

Web Title: malegaon news ganesh visarjan