रास्ता रोकोनंतर वारसांना एक लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मालेगाव - अजंग- दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात ट्रॅक्‍टर उलटल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृतांचे कुटुंबीय व जखमींना राज्य शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी. दुर्घटनेला दोषी असलेल्या ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी वडेल ग्रामस्थांनी आज सकाळी मालेगाव- नामपूर रस्त्यावरील वडेल चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी अकराला आंदोलनास सुरवात झाली. पावणेदोन तासानंतर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनस्थळी जाऊन शासनातर्फे मृतांच्या वारसांना एक लाख रुपये मदत व जखमींचा खर्च शासन करणार असल्याचे सांगितल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळी रास्ता रोको आंदोलनाला सुरवात करताना ग्रामस्थांनी शासनाने मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची घोषणा केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. अजंग, वडेल येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी राज्यमंत्री भुसे आंदोलनकर्त्यांसमवेत होते. याच वेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे शहरात आगमन झाले. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. शवचिकित्सागृहात जाऊन मृतदेहांची पाहणी केली. यानंतर शासकीय विश्रामगृहावर जाण्यापूर्वी श्री. महाजन यांनी राज्यमंत्री भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. श्री. भुसे यांनी आंदोलनकर्त्यांची येथे येऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. त्यावर श्री. महाजन यांनी भुसे यांना आपण मोजक्‍या ग्रामस्थांसह तातडीने शासकीय विश्रामगृहावर या. चर्चेनंतर मदत जाहीर करू, असे सांगितले. यानंतर श्री. भुसे मालेगावला आले. दोघा मंत्र्यांची निवडक अधिकाऱ्यांसह बंद दरवाजाआड चर्चा झाली. यानंतर श्री. महाजन यांनी पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली. यानंतरच त्यांच्या हेलिकॉप्टरचे मसगा महाविद्यालयाच्या मैदानावरून उड्डाण झाले.

श्री. महाजन रवाना झाल्यानंतर श्री. भुसे यांनी परत वडेल गाठले. येथे आंदोलनकर्त्यांना मदतीबाबत माहिती देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच अतिरिक्त मदतीसाठी प्रयत्न करू, असेही सांगितले. श्री. भुसे यांच्या आश्‍वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. या वेळी प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे उपस्थित होते. उपअधीक्षक शशिकांत शिंदे, वडनेरचे सहाय्यक निरीक्षक सुहास राऊत व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सामाजिक सद्‌भावनेतून मदत - पालकमंत्री गिरीश महाजन
अजंग- दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलाव दुर्घटना नैसर्गिक आपत्ती नसली, तरीदेखील महिला शेतमजूर असल्याने सामाजिक सद्‌भावनेतून मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खास बाब म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केली. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत श्री. महाजन यांनी ही घोषणा केली. जखमी रुग्णांचा खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च शासन करेल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त महेश झगडे, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिसप्रमुख संजय दराडे आदी उपस्थित होते.