मनमाड-इंदूर रेल्वेमार्गामुळे यंत्रमाग, उद्योगाला चालना 

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गामुळे यंत्रमाग, उद्योगाला चालना 

मालेगाव - उत्तर महाराष्ट्र व प्रामुख्याने धुळे-मालेगाव या औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रमुख शहरांतील यंत्रमाग, औद्योगिक वसाहती व शेतीपूरक उद्योगाला बहुप्रतीक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गामुळे चालना मिळेल. मार्गावरील चार प्रमुख औद्योगिक वसाहती, यंत्रमाग व शेतीपूरक उद्योगातून किमान 80 हजार नवीन रोजगारनिर्मिती शक्‍य होईल. मध्य प्रदेशातील अविकसित व आदिवासी भागात विकासाला चालना मिळेल. सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या या मार्गाचा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाला सादर झाला आहे. 

रेल्वे बोर्डाने पश्‍चिम रेल्वेच्या निर्माण विभागाला आदेश देताच भूमी अधिग्रहणास सुरवात होईल. यासाठी साडेतीन हजार हेक्‍टरवर भूसंपादन होईल. मार्गावर 38 रेल्वेस्थानके असतील. यंत्रमाग व्यावसायिकांसाठी इंदूर, सुरत या दोन प्रमुख बाजारपेठांसह राजस्थान व दिल्लीचे अंतर कमी होईल. उत्तर प्रदेशातील कामगार व व्यापाऱ्यांचा रेल्वेमुळे प्रवास सुलभ होईल. परराज्यातील व्यापाऱ्यांशी संपर्कामुळे उद्योग व रोजगारनिर्मितीस हातभार लागेल. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग 357.37 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी नऊ हजार 960 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यंत्रमागाबरोबरच अन्य मालवाहतुकीलाही यामुळे चालना मिळणार आहे. इंदूरहून दर वर्षी सुमारे 40 हजार कंटेनर मुंबईला जेएनपीटी बंदरात गुजरातमार्गे जातात. हा मार्ग झाल्यास मुंबई-इंदूर हे अंतर 200 किलोमीटरने कमी होईल. रेल्वेला यातून सुमारे 700 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. हजारो जणांना रोजगार उपलब्ध होईल. ही बाब लक्षात घेऊनच या प्रकल्पासाठीचा 50 टक्के खर्च रेल्वे मंत्रालय व 50 टक्के खर्च जहाज मंत्रालय करणार आहे. रेल्वेमार्गामुळे मुंबई, दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये समावेश असलेल्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील अविकसित गावांच्या विकासाला चालना मिळेल. या रेल्वेमार्गात मालेगाव, धुळे, नरडाणा, शिरपूर, सेंधवा, धामनोद, महू या सात महत्त्वाच्या स्थानकांच्या परिसरातील उद्योगवाढीला हातभार लागेल. प्रमुख चार औद्योगिक वसाहती विकसित झाल्यास किमान 50 हजार जणांना रोजगार मिळेल. यंत्रमाग क्‍लस्टर व पूरक उद्योग थाटले जातील, असे सूत व्यापारी महेश पाटोदिया यांनी सांगितले. 

शहरात येणाऱ्या सूत वाहतुकीचा खर्च कमी होऊन कापड उत्पादन खर्चात बचत होईल. यंत्रमागाबरोबरच मध्य प्रदेश व उत्तर महाराष्ट्राचा शेतमाल व शेतीपूरक व्यवसायानिमित्त इंदूरशी नजीकचा संबंध आहे. शेतमाल वाहतुकीची सोय होऊन प्रक्रिया उद्योग वाढीस लागतील. मध्य प्रदेशातून गहू, सिमेंट व अन्य मालाची वाहतूक सोयीची होईल. यंत्रमाग कामगारांना दिल्लीचे अंतर कमी झाल्यामुळे प्रवास सुलभ होईल. भिवंडीप्रमाणे मालेगाव शहरात रेल्वे सुविधेमुळे परराज्यातील व्यापारी येतील. यामुळे येथील व्यापार वाढतानाच नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान होईल. 

दक्षिणेबरोबरच मध्य प्रदेश व गुजरातमधून यंत्रमाग कापडनिर्मितीसाठी लागणारे सूत (यार्न) मालेगावी येते. रेल्वेमार्ग झाल्यास सूत वाहतुकीचा खर्च कमी होईल. व्यापारी व यंत्रमाग व्यावसायिकांची सोय होईल. कापड निर्यातीला चालना मिळेल. सुरत, अहमदाबाद या शहरांत मालेगावातील कापड प्रक्रियेसाठी पाठविण्यात येते. सध्या ट्रकने हा माल पाठविला जातो. कच्च्या मालवाहतुकीची रेल्वेमार्गामुळे मोठी सोय होईल. परिसरात प्रक्रिया उद्योग वाढीस लागल्यास रोजगार वाढेल. 
-युसूफ इलियास,  अध्यक्ष, मालेगाव तालुका पॉवरलुम संघर्ष समिती 

शहरात गुजरातमधून यंत्रमागासाठी लागणारी सामग्री मोठ्या प्रमाणावर आणली जाते. सुरत-अहमदाबादमधील जुन्या यंत्रमागांचा येथे वापर होतो. यंत्रमाग व यंत्रमागासाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री आणणे रेल्वेमार्गामुळे सोयीचे होणार आहे. किमान दहा वर्षांत तरी हा रेल्वेमार्ग व्हावा, अशी अपेक्षा आहे. 
-शब्बीर अहमद डेगवाले,  यंत्रमाग व्यावसायिक व अभ्यासक 

मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्गाचा यंत्रमाग व्यवसायाला 25 टक्के फायदा आहे. मात्र हा रेल्वेमार्ग औद्योगिक वसाहत, शेतीपूरक उद्योग यांना सर्वांत लाभदायक ठरणार आहे. मुंबई-दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, राष्ट्रीय महामार्ग तीन व रेल्वेमार्ग असा तिहेरी योग जुळून आल्यास आगामी काळात उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा वेग दुपटीने वाढणार आहे. धुळे व मालेगावला त्याचा मोठा लाभ होईल. रोजगार वाढेल. 
-महेश पाटोदिया  सूत व्यापारी, मालेगाव 

मालेगाव शहरानजीक अजंग शिवारात शेती महामंडळाच्या जमिनीवर पश्‍चिम औद्योगिक वसाहत आकाराला येत आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, निफाड येथील ड्रायपोर्ट व मालेगाव-धुळे येथील औद्योगिक वसाहतीचा पूर्ण क्षमतेने विकास होण्यासाठी रेल्वेमार्ग हितावह ठरणार आहे. उत्तर महाराष्ट्रात रोजगाराची साधने नाहीत. हा मार्ग रोजगारनिर्मितीला चालना देणारा ठरेल. राज्य शासनाने भूसंपादन लवकर करून द्यावे. रेल्वेमार्ग कमीत कमी कालावधीत व जलदगतीने व्हावा. 
-तुषार पाटील, मालेगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com