अंदाजपत्रक व घरकुलप्रश्‍नी महासभेत सत्तारुढ-विरोधकांमध्ये खडाजंगी

अंदाजपत्रक व घरकुलप्रश्‍नी महासभेत सत्तारुढ-विरोधकांमध्ये खडाजंगी

मालेगाव - महापालिकेच्या अंदाजपत्रकास विरोधी नगरसेवकांनी शासनाकडे चुकीच्या तक्रारी करून व दिशाभूल करून स्थगिती मिळवली आहे. यामुळे विकासकामांबरोबरच वेतन व निवृत्तिवेतन यावर परिणाम होईल. कब्रस्तान, स्मशानभूमी व प्रार्थनास्थळांच्या कामांबद्दल तक्रारी झाल्याने विरोधकांचा खरा चेहरा उघड झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी केल्यानंतर महासभेत सत्तारुढ व विरोधी सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. घरकुल योजनेची चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. महापालिकेच्या मालमत्ता, सार्वजनिक शौचालय यांच्या सुरक्षिततेसाठी ठेका पद्धतीने कामगार नियुक्ती व शौचालय ठेका पद्धतीने देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी महासभेला सुरवात झाली. प्रभारी आयुक्त तथा बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे उपस्थित होते. घरकुल प्रश्‍नावर जोरदार चर्चा झाली. निकृष्ट बांधकाम, योजनेच्या कामाला होत असलेला विलंब, लाभार्थी यादी, कामातील गैरव्यवहार, योजनेला मंजुरी देताना झालेला भ्रष्टाचार, प्रशासनाचा निष्काळजीपणा, लाभार्थी हिस्सा, घरकुल योजना परिसरात अन्य पायाभूत सुविधा, शाळा, वीज, मार्केट याबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका मालमत्तेच्या संरक्षणासाठी ठेका पद्धतीने कर्मचारी नियुक्ती, शौचालय ठेका पद्धतीने देणे, संगमेश्‍वर भागातील या. ना. जाधव विद्यालयालगत उद्यान विकसित करणे, गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून टपरी मिळण्यासाठी महापालिकेने ना हरकत दाखला देणे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी नियुक्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, महापालिका रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३० नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव, महापालिका रुग्णालयात वाढीव मानधनावर स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती, शासनाला पाठविणे, तळवाडे तलावाजवळ रोपवाटिका व उद्यान विकसित करणे, सिद्धिविनायक मंडळ, त्रिशूळ मंडळ, सोशल एज्युकेशन सोसायटी, सायरा वेल्फेअर संस्था आदी संस्थांना रेडिरेकनर दराने भूखंड देणे, शासकीय निधीतील कार्यादेश दिलेली प्रलंबित कामे सुरू करणे आदी ठराव मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकाच्या मुद्द्यावरून अस्लम अन्सारी व बुलंद एकबाल यांच्यात खडाजंगी झाली. 

हद्दवाढ भागातील ४८ कर्मचाऱ्यांना मोबदल्यात वाढ करण्याचा प्रस्ताव नियमाप्रमाणे शासन मंजुरी व आयुक्तांच्या अहवालाप्रमाणे निर्णय घ्यावा, अशी सूचना सदस्यांनी केली. म्हाळदे शिवारातील भूखंड न्यू फ्लॉक्‍स संस्थेला देणे व महापालिका रुग्णालयातील सुविधांसंदर्भात चर्चेचा प्रस्ताव संबंधित दोघा नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नस्तीबंद करण्यात आला. 

घरकुल योजनेसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून महापालिकेने ११ केव्ही वीजवाहिनीच्या सुरू केलेल्या कामासंदर्भात सदस्यांनी टीका करतानाच विविध मुद्दे उपस्थित केले. या कामासाठी अतिरिक्त खर्चाची निविदा मंजूर केल्याचा ठपका नगरसेवकांनी ठेवला. महावितरणनेच हे काम करायला हवे होते, असे मत व्यक्त केले. शहरातील विविध चौक, रस्ते व कॉलन्यांना नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तळवाडे साठवण तलावास श्री. घोडके यांच्या सूचनेप्रमाणे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री सागर नाव देण्याचा, तसेच डीके कॉर्नरजवळील उद्यानास राजमाता माँसाहेब जिजामाता नाव देण्याचा राजाराम जाधव यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सटाणा रस्त्यावरील महिला व बाल रुग्णालयास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्याची नीलेश आहेर यांची सूचनाही मंजूर करण्यात आली.

महासभेतील चर्चेत सखाराम घोडके, नीलेश आहेर, युनूस ईसा, बुलंद एकबाल, मदन गायकवाड, खालीद परवेज, ज्योती भोसले, ताहेरा शेख, विठ्ठल बर्वे, अस्लम अन्सारी, आतीक कमाल, मन्सुर अहमद, जयप्रकाश बच्छाव, दीपाली वारुळे, फैजुल्ला खान आदींनी सहभाग घेतला.

कर्मचाऱ्यांना वेतनही मिळणार नाही
महापालिकेच्या अंदापत्रकाला स्थगिती मिळाल्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे वेतन तसेच निवृत्तिवेतनही अदा करता येणार नाही का, असा प्रश्‍न महापौर रशीद शेख व अन्य सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर लेखापाल कमरुद्दीन शेख यांनी वेतनही अदा करता येणार नाही, असे उत्तर दिल्यानंतर आता सफाई कामगार व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अंदाजपत्रकाला स्थगिती मिळविणाऱ्या नगरसेवकांच्या घरासमोर आंदोलन करावे, असा टोमणा मारला. अंदाजपत्रक स्थगितीमुळे वेतनही होणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी व कामगार हवालदिल झाले. अंदाजपत्रकाला नगरविकास विभागाने स्थगिती देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. महापालिकेच्या अहवालानंतर स्थगिती उठण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी, या प्रश्‍नावरून शहरात जोरदार राजकारण सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com