मालेगावच्या शहा कुटुंबीयांनी दिली भूतदयेची प्रचीती 

राजेंद्र दिघे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

मालेगाव कॅम्प - येथील सामाजिक कार्यकर्ते व मालेगाव मर्चंट्‌स बॅंकेचे संचालक गौतम शहा व त्यांच्या कुटुंबीयांनी आज बकरी ईदला कुर्बानीसाठी नेल्या जाणाऱ्या 51 मुक्‍या प्राण्यांचे जीव वाचवून, खरी भूतदया काय असते, याचे जिवंत उदाहरणच समाजापुढे ठेवले. बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेले 51 प्राणी शहा कुटुंबीयांनी खरेदी केले असून, त्यांना गोशाळेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

मालेगाव कॅम्प - येथील सामाजिक कार्यकर्ते व मालेगाव मर्चंट्‌स बॅंकेचे संचालक गौतम शहा व त्यांच्या कुटुंबीयांनी आज बकरी ईदला कुर्बानीसाठी नेल्या जाणाऱ्या 51 मुक्‍या प्राण्यांचे जीव वाचवून, खरी भूतदया काय असते, याचे जिवंत उदाहरणच समाजापुढे ठेवले. बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेले 51 प्राणी शहा कुटुंबीयांनी खरेदी केले असून, त्यांना गोशाळेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

भूतदया, प्राणिमात्रांबद्दलची सहानुभूती, सामाजिक बांधिलकी अशी विशेषण आपण नेहमीच ऐकतो. मात्र, आज बकरी ईदच्या निमित्ताने मालेगावकरांनी या भावनेची खरी प्रचीती अनुभवली. भगवान महावीरांनी दिलेल्या "अहिंसा परमोधर्म'चा संदेश प्रत्यक्ष आचरणात आणून शहा कुटुंबीयांनी मालेगावमध्ये एक नवा वस्तुपाठच कायम केला. त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कुर्बानीसाठी मोठ्या प्रमाणात म्हशी, रेड्यांबरोबरच शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आणले होते. बाजार समितीतून शेळी, बोकड खरेदी करुन अन्यत्र विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या कुरेशी बांधवांकडून श्री. शहा व कुटुंबीयांनी जवळपास दोन लाख खर्चून 50 शेळ्या व करडू असे 51 मुके प्राणी खरेदी केली. गौतम शहा, त्यांची पत्नी मंजुश्री व मुलांनी दोन दिवस बंगल्याच्या आवारातील परसबागेत त्यांना चारापाणी करत या जनावरांची निगाही राखली. प्राणिमात्राचे जीव वाचविण्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शहा कुटुंबीयांकडून गोसेवा सुरू होती. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली. नाशिक येथील सारिका शहा, मेहुणे नीलेश शहा, परेश शहा यांनीही त्यांना पाठबळ दिले. 

दरम्यान, शहा कुटुंबीय आपल्या परीने नेहमीच गोसेवा व सामाजिक कार्यात हातभार लावण्याकामी अग्रेसर असतात. आघार (ता. मालेगाव) येथील रामराज्य ग्रुपच्या चारा छावणीला गेल्या वर्षी दुष्काळात चारा उपलब्ध करून देतानाही या कुटुंबाने हातभार लावला होता. त्यातून अनेक जनावरांना आधार मिळाल्याचे ग्रुपचे रामचंद्र हिरे यांनी सांगितले. 

प्राणिमात्रांवर दया करावी, हा भगवान महावीरांचा संदेश आहे. त्यातून आपण समाजाचे काही ऋण फेडावे, या हेतूने विविध माध्यमांतून सामाजिक उपक्रम सुरू असतात. त्यातूनच ही जनावरे खरेदी केली. त्यांचे प्राण वाचल्याचे मोठे समाधान आहे. ही जनावरे गोशाळेकडे सुपूर्द करून त्यांच्या पालनपोषणासाठी कायमस्वरूपी चारापाण्याची व्यवस्था करणार आहे. 
-- गौतम शहा, मामको बॅंक, संचालक