मालेगाव हागणदारी मुक्तीच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मालेगाव कॅम्प - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मालेगाव शहर हागणदारीमुक्त करण्याचे अभियान येथील पालिका प्रशासनाने महिनाभरापासून राबविले होते. राज्य शासनाकडून ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मुदतीअखेर पाच हजार ७७२ वैयक्तिक व ५० सार्वजनिक शौचालये कार्यान्वित झाल्याची माहिती स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे प्रमुख अभिजित पवार यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वीच आयुक्त संगीता धायगुडे यांनी पदभार स्वीकारत शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. वैयक्तिक शौचालयांचे कामदेखील वेगाने पूर्ण करण्यात येत होते. हागणदारीमुक्तीसाठी पालिकेकडून जनजागृती करणे, कार्यशाळा घेणे, स्वयंघोषणापत्र घेणे, असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. यात शहरातील विविध संस्था, रोटरी यांसारख्या अनेक संस्थांना सहभागी होण्यासाठी आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन ८० हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे शहरातील सुमारे ५८ ठिकाणे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. त्यातील ५० पेक्षाही जास्त सार्वजनिक शौचालये पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे. 

शासनाने ३१ जुलै मुदत दिल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली होती. मुदतीअखेर हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. अहवाल शासनाला सादर केला आहे. लवकरच शासनाच्या समितीकडून बाह्य मूल्यांकन करण्यासाठी मालेगाव दौऱ्यात पाहणी होईल. समितीच्या अहवालानंतरच पालिकेला शहर हागणदारीमुक्त करण्यात कितपत यश आले, हे स्पष्ट होणार आहे.