ट्रॉली तलावात उलटून सात महिला मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मालेगाव - तालुक्‍यातील अजंग- दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात शेतमजूर महिलांचा ट्रॅक्‍टर उलटल्याने पाण्यात बुडून सात महिला मृत्युमुखी, तर बारा महिला जखमी झाल्या. आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅक्‍टरचालकाला रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.

अजंग येथील मोहन कारभारी अहिरे यांच्या शेतात कांदा लागवडीसाठी वडेल येथील या शेतमजूर महिला गेल्या होत्या. सकाळी जीपमधून दोन टप्प्यांत या महिला कामावर गेल्या होत्या. कांदा लागवड आटोपल्यानंतर सर्व महिलांना एकाच वाहनातून सोडता यावे, या हेतूने ट्रॅक्‍टरने त्यांना घरी सोडण्याचे ठरले. शेतातून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. तलावापासून वडेल चार किलोमीटर अंतरावर आहे. तलावाजवळून दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी कच्चा रस्ता आहे. या भागातील शेतीमाल याच रस्त्याने वाहतूक होत असतो. गेल्या काही दिवसांपासून रस्ता पाण्याखाली होता. तरीदेखील त्यावरून वाहतूक सुरू होती. तलावातील पाणी अचानक वाढल्याने नजीकच्या रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्‍टर ट्रॉली तलावात उलटली. यात उषाबाई गणेश भदाणे, संगीता गोरख भदाणे, रोहिणी रमन शेलार, आशाबाई जगन्नाथ मळके, सुनंदा रघुनाथ शेलार, संगीता किशोर महाजन, रंजना किसन महाले (सर्व रा. वडेल) यांचा मृत्यू झाला.