इंदूर-मनमाड रेल्वेमार्गाचे सहा महिन्यांत भूमिपूजन - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

धुळे - खानदेशवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बहुप्रतीक्षित मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन येत्या सहा महिन्यांच्या आत होईल, असे आश्‍वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिले.

धुळे - खानदेशवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बहुप्रतीक्षित मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन येत्या सहा महिन्यांच्या आत होईल, असे आश्‍वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिले.

धुळे- औरंगाबाद या नवीन महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते आज झाले. येथील पोलिस कवायत मैदानावर त्यांनी या कामाची कोनशिला अनावरण केले. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार अनिल गोटे, आमदार डी. एस. अहिरे, आमदार अमरिशभाई पटेल, महापौर कल्पना महाले, आमदार स्मिता वाघ, आमदार अद्वय हिरे, अनुप अग्रवाल, बबन चौधरी, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, महापालिका आयुक्त संगिता धायगुडे आदी उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, की मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाच्या प्रश्‍नासाठी आमदार गोटे, खासदार डॉ. भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी मी विरोधी पक्षनेता असताना अनेक वेळा पत्रे दिली. ज्या दिवशी संधी मिळेल, त्या दिवशी हे काम माझ्या हातूनच होईल, असेही मी म्हटले होते आणि मी शब्दाला पक्का असल्याने आज हा प्रश्‍न मार्गी लागला आहे. येत्या सहा महिन्यांच्या आत मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन होईल. या भूमिपूजनासाठी माझ्यासह रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री धुळ्यात येऊ. या रेल्वेमार्गासाठी हवे तर कर्ज घेऊ, असेही मंत्री गडकरी म्हणाले.

तापी नदी जलमार्ग घोषित
रस्ते, रेल्वेमार्गांचे जाळे उभारण्याबरोबरच तुलनेने कमी वाहतूकखर्च लागणाऱ्या जलमार्ग विकासाकडेही केंद्र शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत कामही सुरू झाले आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीदेखील जलमार्ग म्हणून घोषित केली असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले. पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे. त्यासाठी पावसाचे पाणी अडविण्याची गरज आहे. जिल्ह्यात आगामी काळात जे रस्ते होणार आहेत, त्या रस्त्यांवर जेवढे पूल होतील, तेथे "ब्रीज- कम- बंधारे' होतील. यातून सिंचनासाठी मोठे काम होणार आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही मंत्री गडकरी यांनी येथील लोकप्रतिनिंधीना दिला. नाशिकसह इतर काही ठिकाणी "ड्राय पोस्ट' (कांदा, द्राक्षांसाठी) उभारणार असल्याचेही ते म्हणाले.

गडकरी आमचे आधार
मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग अथवा कोणतेही काम महाराष्ट्रातील खासदारांचे दिल्लीतील आधार म्हणजे गडकरी असल्याचे डॉ. भामरे प्रास्ताविकात म्हणाले. जिल्ह्याच्या विकासाचा "बॅकलॉग' भरून काढण्यासाठी गडकरी आले आहेत.