नागरिकांच्या सजगतेमुळे पुण्यातील तरुणी सुखरूप घरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

रागाच्या भरात घर सोडून गेली होती मनमाडमध्ये
मनमाड - पुणे येथून रागाच्या भरात घर सोडून आलेल्या 22 वर्षीय तरुणीला सामाजिक कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले. मुलगी सुखरूप असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले.

आई-वडील रागावले म्हणून ही तरुणी रागाच्या भरात घरातून बाहेर पडून थेट रेल्वेस्थानक गाठून मनमाडला पोचली. मनमाड रेल्वेस्थानक परिसरात काही टवाळखोरांनी तिला छेडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती घाबरली. जवळ पैसे नसलेल्या आणि उपाशीपोटी ती मनमाडपासून दहा किलोमीटरवरील रायपूर या गावी जाऊन पोचली. गावात अनोळखी तरुणी बेवारसपणे फिरत असल्याचे पाहून या भागातील छायाचित्रकार पुंडलिक घोरपडे यांनी तिची विचारपूस केली. रागाच्या भरात आपण घर सोडून आल्याचे तिने सांगितले.

घोरपडे व त्यांचे मित्र दत्तू कोल्हे, चंद्रभान कोल्हे, सोमनाथ म्हस्के यांनी तिला जेवण दिले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याशी संपर्क साधत या तरुणीची भेट घालून दिली. डॉ. खाडे यांनी या तरुणीला पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्याकडे पाठविले. मात्र, तिला अशक्तपणा जाणवत असल्याने आधी दवाखान्यात पाठविले. तिच्याशी संवाद साधून तिच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळवीत त्यांच्याशी संपर्क साधून मुलगी सुखरूप असल्याचे सांगितले. तिचे वडील नातेवाइकांबरोबर तातडीने मनमाड पोलिस ठाण्यात आले व मुलीला घेऊन पुण्याकडे रवाना झाले.