भूल उतरल्यावर महिलांवर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मनमाड - येथील उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल दोघा महिलांना दिलेली भूल उतरल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना तीव्र वेदनांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचे बळ न राहिलेल्या या महिलांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार केली असून, चुकीच्या पद्धतीने उपचार करणाऱ्या या बेजबाबदार डॉक्‍टर व परिचारिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मनमाड उपजिल्हा रुग्णालयात विद्या राजेंद्र सानप, नाजनीन खालिद शेख (रा. मनमाड) या दोन महिला सोमवारी (ता. 30) कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या. तपासणीनंतर मंगळवारी (ता. 31) सकाळी त्यांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी त्यांना भूल देण्यात आली. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे हे रजेवर असल्याने त्यांच्या जागी चांदवड दवाखान्याचे डॉ. फैजल यांना बोलावण्यात आले. मात्र, त्याच वेळेस "सिजर'च्या तीन रुग्णांवर अगोदर उपचार करण्यात आले, त्यामुळे या महिलांची शस्त्रक्रिया दुपारी दोन वाजता करण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांची भूल पूर्ण उतरली होती. अशावेळी भूल नसताना डॉक्‍टरांनी या महिलांची शस्त्रक्रिया केल्याने त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. भूल नसल्याचे डॉक्‍टरांना सांगूनही आम्ही डॉक्‍टर आहोत, आम्हाला सर्व कळते, असे सांगत आमचे तोंड हाताने दाबण्यात आले. तसेच, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया न करताच टाके घालण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या शस्त्रक्रियेने महिला घाबरल्या असून, आता पुन्हा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.