पोलिसांच्या इशाऱ्यानंतर मनमाड रेल्वेस्थानकात ‘हाय अलर्ट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

मनमाड - भिकाऱ्यांच्या वेशात अतिरेक्‍यांचा हल्ल्याचा डाव असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी रेल्वे विभागाला सांगितल्याच्या पार्श्‍वभूमीवर मनमाड रेल्वेस्थानकावर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. श्‍वानपथकाद्वारे कसून तपासणी करतानाच हमालांची बैठक घेऊन रेल्वे अधिकारी, लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा जवानांनी सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

देशातील प्रमुख स्थानकांवर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून, प्रमुख स्थानकांपैकी असलेल्या मनमाड रेल्वेस्थानकात खबरदारी घेण्यात येत आहे. भुसावळ येथील श्‍वानपथक, बाँबशोधक पथक, रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेस्थानकाची कसून तपासणी केली. स्थानकात असलेल्या सहा फलाटांबरोबर तिकीट बुकिंग ऑफिस, पार्सल ऑफिस, विश्रामगृह यांची तपासणी केली जात आहे. रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. तिकीट बुकिंग ऑफिसजवळ भिकाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे भिकाऱ्यांसह अनोळखी व्यक्ती, तसेच अनोळखी विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. स्थानकातील हमालांची बैठक रेल्वे विश्रामगृहात घेण्यात येऊन स्थानकात येणारी अनोळखी माणसे, भिकारी, अनोळखी खाद्यविक्रेते आदींवर नजर ठेवावी. काही संशयास्पद हालचाली वा वस्तू आढळल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन स्टेशन मास्टर पी. के. सक्‍सेना, ‘आरपीएफ’चे पोलिस निरीक्षक के. डी. मोरे यांनी केले. या वेळी लोहमार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कुलकर्णी, ‘आरपीएफ’चे रजनीश यादव, उपनिरीक्षक एम. डी. सोनवणे उपस्थित होते.

Web Title: Manmad railway station high alert