मनमाड तलाठी कार्यालय अजूनही ऑफलाइनच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

मनमाड - महसूल विभाग ऑनलाइन झाला असला तरी येथील तलाठी कार्यालयातील नोंदीचे कामकाज मात्र कासवगतीने सुरू आहे. इंटरनेट सर्व्हर डाउन असल्याने जानेवारी 2016 पासून नोंदी करण्याचे काम रखडले आहे. सुमारे हजार नोंदी रखडल्याने महसूल संदर्भातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जोपर्यंत ऑनलाइन सेवा अपडेट होत नाही तोपर्यंत जुन्याच पद्धतीने कामकाज करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

कामकाज ऑनलाइन झाल्याने 7/12 उतारा एका क्‍लिकवर मिळू लागला. मात्र मनमाड तलाठी कार्यालय याला अपवाद म्हणता येईल. तलाठी कार्यालय ऑनलाइन झाले असले, तरी येथील कामकाज हे ऑफलाइन असल्यासारखेच आहे. येथे होणारे गहाणखत, खरेदीखत, हक्कसोडपत्र, बक्षीसपत्र, वारसनोंदीसह इतर व्यवहार झाले आहेत. मात्र 5 जानेवारी 2016 पासून या व्यवहारांच्या तलाठी दप्तरी होणाऱ्या नोंदी झालेल्या नाहीत. एका नोंदीला मंजूर होण्याचा कालावधी 15 दिवसांचा असतो. मात्र ऑनलाइन सर्व्हर डाउन असल्याने 12 महिने झाले असले तरी नोंदी होऊ शकलेल्या नाहीत. यामुळे हजार नोंदींचे काम रखडले आहे. येथे साडेअकरा हजार सातबारा खातेदार असून, सुमारे 70 पुस्तके आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत केवळ 150 ते 200 नोंदी ऑनलाइन दप्तरी झाल्या आहेत. इंटरनेट सर्व्हर सतत डाउन असते. कधी कधी दिवसाआड सर्व्हर सुरू असते. 

अनेक व्यवहार रखडले 
मनमाड हे कामगार वस्तीचे शहर असल्यामुळे गहाणखत, खरेदीखत, बक्षीसपत्रे मोठ्या प्रमाणात होतात. या व्यवहाराच्या नोंदी दप्तरी न झाल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. लग्न, आजारपणासाठी पैसा उपलब्ध होत नाही. शहरी नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा व्यवहार करूनही उताऱ्यावर नोंदी न झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे. सर्व्हर ठीक होईपर्यंत जुन्याच पद्धतीने नोंदी दप्तरी करण्याचे कामकाज करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. गेल्या दीड महिन्यात 150 नोंदी झाल्या असून, प्रायव्हेट ब्रॉडबॅंड कनेक्‍शनद्वारे नोंदी केल्या जात आहेत. यापुढेही तीन महिन्यांच्याही पुढे कालावधी लागेल असे तलाठी घाडगे यांनी सांगितले. पेंडिंग असलेल्या नोंदी गोरगरिबांच्या दिसून येतात. ठराविक लोकांचे काम लवकर केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. 

Web Title: Manmad Talathi office still offline

टॅग्स