गुणाजी जाधव खून प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा भोसकून खून

गुणाजी जाधव खून प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा भोसकून खून

नाशिक : रामवाडीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघा संशयितांनी जुन्या वादाची कुरापत काढून 26 वर्षीय युवकावर धारदार हत्त्यारांनी वार करीत त्याचा निर्घृणपणे खून केला. किशोर रमेश नागरे (26, रा. विश्‍वास चांगले यांच्या खालीत, रामनगर, रामवाडी, पंचवटी) असे मृत युवकाचे नाव असून तो, गुणाजी जाधव खूनप्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.. 
.... 
 ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबारा-एक वाजेच्या सुमारास घडली. मृत किशोरचा भाऊ सचिन रमेश नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोर नागरे मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील पटांगणात उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून तिघे संशयित तोंडाला रुमाल बांधून आले. किशोरला सावध होण्याच्या आतच संशयितांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी सपासप वार केले. छाती, पोट, मान, पाठीवर गंभीर वार केल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला. गंभीररित्या जखमी झालेला किशोर जागेवरच कोसळल्यानंतर संशयितांनी पोबारा केला. सदरची बाब लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी जखमी किशोरला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. 


घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडळ दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, सहाय्यक आयुक्त शांताराम पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पहाटे अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिघा संशयितांची ओळख पटली असून शुभम निवृत्ती पांढरे यास अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन संशयितासह अविनाश रावसाहेब वाणी उर्फ वामन्या याचा पोलीस शोध घेत आहेत. 

पंचवटीत पुन्हा गॅंगवार 
किशोर नागरे आणि परेश मोरे यांच्यात बाचाबाची झाल्याने, त्यांच्यातील वाद मिटविण्यासंदर्भात 16 सप्टेंबर 2015 रोजी रात्री ठक्कर बाजार बसस्थानकाशेजारील हॉटेल तुळजा येथे किशोर नागरे, गुणाजी जाधव आणि त्यांचे साथीदार मद्यपान करून जेवण करीत होते. त्यावेळी संशयित परेश मोरे, व्यंकटेश मोरे व त्यांचे साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी धारदार हत्यारांनी हल्ला चढविला. यात गुणाजी जाधव याचा खून झाला तर किशोर नागरे वाचला होता. याच खून प्रकरणात तो मुख्य साक्षीदारही होता. तसेच नागरे याच्याविरोधात सरकारवाडा पोलिसात छेडछाडी-मारहाणीसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांसाठी तो डोकेदुखीच होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com