महाविराट मराठा लाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

धुळे - कोपर्डी (जि. नगर) येथील अल्पवयीन युवतीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि तिची अमानुष हत्या झाल्याने विषण्ण झालेले मन, शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्या रोखल्या कशा जातील हा विचार, तसेच शैक्षणिक सवलती, आरक्षण मिळत नसल्याने नोकरीच्या संधी पदरात पडत नसल्याने नैराश्‍याचे वातावरण मराठा समाजातील तरुण पिढीत निर्माण होत आहे. त्यामुळे त्यातील अस्वस्थता मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडत आहे आणि त्यातून तरुण पिढीसह समाजबांधवांनी अन्याय- अत्याचाराच्या निषेधार्थ, हक्कांसाठी एल्गार पुकारला आहे. तो धुळे शहरात आज जमलेल्या लाखोंच्या संख्येतील मोर्चेकऱ्यांमुळे धारदार झाला.

धुळे - कोपर्डी (जि. नगर) येथील अल्पवयीन युवतीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि तिची अमानुष हत्या झाल्याने विषण्ण झालेले मन, शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्या रोखल्या कशा जातील हा विचार, तसेच शैक्षणिक सवलती, आरक्षण मिळत नसल्याने नोकरीच्या संधी पदरात पडत नसल्याने नैराश्‍याचे वातावरण मराठा समाजातील तरुण पिढीत निर्माण होत आहे. त्यामुळे त्यातील अस्वस्थता मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडत आहे आणि त्यातून तरुण पिढीसह समाजबांधवांनी अन्याय- अत्याचाराच्या निषेधार्थ, हक्कांसाठी एल्गार पुकारला आहे. तो धुळे शहरात आज जमलेल्या लाखोंच्या संख्येतील मोर्चेकऱ्यांमुळे धारदार झाला.  शहरात मोर्चाच्या संयोजकांच्या अपेक्षापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने गर्दी नियंत्रणात येत नव्हती. या अलोट भगव्या त्सुनामीने राज्यात निघालेल्या मराठा मोर्चांच्या गर्दीचा कळस चढविला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारोळा रोडवरील पुतळ्याला अभिवादन करून  सकल मराठा क्रांती मूक मोर्चाला दुपारी बाराला सुरवात झाली. सकाळी साडेअकराला प्रियांका जगदीश माने, साक्षी मनोज मोरे, पूर्वा प्रशांत साळुंखे आदी पाच विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर दुपारी बाराला मोर्चाल प्रारंभ झाला. या मुलींनी त्यांच्या निवेदनात कोपर्डी घटनेतील अत्याचार, आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाचा हुंकार पेटला. उपस्थितांच्या जय शिवाजी-जय जिजाऊ, एक मराठा -लाख मराठा या घोषणांनी आसमंत दुमदुमला. चारही दिशांकडून उसळलेल्या विराट भगव्या लाटेतून मराठा मोर्चेकऱ्यांचा हक्कांसाठीचा हुंकार उमटला. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे, मागण्यांसह अन्याय- अत्याचारासंबंधी निषेधार्थ हातात घेतलेले फलक हा हुंकार अधिक ठळक करत होते. पाहावे तिकडे गर्दीने भरलेले रस्ते अन्‌ चौक... महिला, तरुण- तरुणी, विद्यार्थिनींच्या,  लक्षणीय उपस्थितीसह लाखोंच्या सहभागाने हा मोर्चा दुपारी बाराला सुरू झाला. सकाळी आठपासूनच देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जळगाव रोड आणि अग्रसेन महाराज पुतळ्यापासून मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने मोर्चाच्या मुख्य स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत होते. मुली, महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. मोर्चाने येथेही इतिहास रचला. धुळे जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा मोर्चा म्हणून त्याच्यावर शिक्कमोर्तब झाले. नेतृत्वासाठी नसलेला कुठलाही विशिष्ट चेहरा हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. विविध मार्गांवरून आलेले जणू मराठा मोर्चाचे भगवे वादळ शहरात धडकत होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोर्चेकरी भगवे ध्वज, विविध घोषणांचे बॅनर अन्‌ टी-शर्ट, टोप्या घालून आले. दुपारपर्यंत हे वादळ शहरात घोंघावत राहिले. यातून मराठा समाजाचा दबलेला हुंकार आज हक्कांसाठी मोर्चाच्या माध्यमातून घुमत होता. पुतळ्याच्या चारही दिशांना मराठा समाजबांधवांची एवढी गर्दी झाली, की पोलिसांना नियंत्रण करणेही अशक्‍य झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी गिंदोडिया चौकात भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला. सकाळी अकरापर्यंत धुळ्यातील सर्व रस्ते गर्दीने ओसंडले होते.

निर्भयाच्या आठवणीने सर्वच हेलावले
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आल्यानंतर कोपर्डीची निर्भया, आत्महत्या केलेले शेतकरी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी कोपर्डीच्या निर्भयाचे नाव घेताच संपूर्ण मोर्चा त्या अमानवी अत्याचाराच्या कटू आठवणीने हेलावून गेला. लाखोंच्या संख्येने असलेल्या जनसमुदायात श्रद्धांजलीवेळी एकच शांतता पसरली होती.

लेकी, भगिनी, मातांना विश्‍वास देणारा मोर्चा
हा मोर्चा मराठा समाजातील लेकी, भगिनी, मातांना खऱ्या अर्थाने विश्‍वास देणारा ठरला. मोर्चात सहभागी झालेला प्रत्येक माणूस महिलांचं अतिशय आदरपूर्वक स्वागत करत होता, त्यांना रस्ता करून देत होता, पाणी देण्यापासून माहिती सांगण्यापर्यंत सर्वपरीने मदत करत होता. आपल्याला मदत करणारे हे लोक आपल्या घरातील कुणीतरी आहेत, अशी भावना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसत होती. संपूर्ण मोर्चामध्ये तरुणी, महिला आत्मविश्‍वासाने सहभागी झाल्याचे दिसून आले.

मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

शेतीमालाला हमी भाव द्यावा
शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या
ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे
शेतकऱ्यांच्या मुलाला उच्च शिक्षण मोफत मिळावे
इबीसी सवलतीची मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत करावी
आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची तातडीची मदत द्यावी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीला चालना द्यावी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव निधीची तरतूद करावी

मूक मोर्चाचे  आदर्श उदाहरण
धुळ्याच्‍या मूक मोर्चाने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोणतीही घोषणाबाजी, टाळ्या, हुल्लडबाजी दिसून आली नाही. लोकांना त्रास होईल असे कोणतेच कृत्य मोर्चात पाहावयास मिळाले नाही. सर्वजण शांततेतच मोर्चामध्ये सहभागी होत होते. मात्र लोकांच्या चेहऱ्यावर मूक आक्रोश, व्यवस्थेविरुद्धची चीड आणि उद्रेक स्पष्ट दिसत होता.