रोगराईची मगरमिठी

residenational photo
residenational photo

नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव विभागाच्या अभ्यासाचे निष्कर्ष ही तर केवळ भविष्यातील भयंकर आरोग्य संकटांची सुरवात आहे.

या पाण्याचे,मातीचे तेथे पिकवला जाणारा भाजीपाला व पिकांचे सखोल पृथक्करण केल्यास या समस्यचे आणखी भयावह स्वरूप समोर येऊ शकते.   

शेतकऱ्यांची खतप्रकल्प (कचरा डेपो) तील कचऱ्याची विल्हेवाट आणि विहिरींमधील दूषित, रासायनिक पाण्याने झोप उडवली आहे. आरोग्याच्या प्रश्‍नाने त्यांना ग्रासले आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. प्रतिमा वाघ यांच्यासह शीतल विसपुते व हर्षदा पाटील या विद्यार्थिनींनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाथर्डी, गौळाणे, पिंपळगाव खांब, वाडीचे रान, विल्होळी, दाढेगाव आदी गावांमध्ये संतापाची लाट उसळली. विषारी पाझरच्या भीतीने हे लोक धास्तावले असून, नवीनच विकार बळावत असल्याने त्यांना काही सुचनासे झाले आहे. "सकाळ'च्या व्यासपीठावरून संवाद साधताना तज्ज्ञांनी आजारापासून ते उपाययोजनांपर्यंतचा ऊहापोह करत ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला. 
"सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी प्रारंभी सर्वेक्षण करणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी कचरा डेपो परिसरातील दहा विहिरींच्या पाणी सर्वेक्षणाची माहिती दिली. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे दोनदा सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी स्थानिक गावातील दहा विहिरींच्या पाण्याचे नमुने घेतले होते तसेच दूरवर असलेल्या मखमलाबादच्या पाण्याचेही नमूने तपासले असल्याचे सांगितले.

 
आजारांचा प्रादुर्भाव वाढता वाढता वाढे 
"सकाळ'च्या व्यासपीठावर झालेल्या चर्चासत्रात दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांची चर्चा झाली. पाथर्डी फाटा परिसरातील डॉक्‍टर अमोल मुरकुटे यांनी पाथर्डी भागात गॅस्ट्रो, टायफाइडच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. जुलाबातून रक्त पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, या भागात पोटदुखीच्या औषधांची विक्री होत असल्याचे नमूद केले. हवा प्रदूषणामुळे लहान बाळांना दम्याचे विकार बळावत असल्याची माहिती त्यांनी दिली. जंतूमुळे पोट, मूत्रपिंडाचे विकार, त्वचा लाल होणे, अंगाला खाज सुटणे, नाक, कान, घशाचे आजार उद्‌भवणे, ऍलर्जी वाढण्याच्या आजारांचे रुग्ण वाढत असून, विशेष म्हणजे पाथर्डी भागात बालदम्याचे रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. 

या उपाययोजनांद्वारे नियंत्रण शक्‍य 
- पाण्याचे रासायनिक पृथक्करण करावे 
- महापालिकेने उद्‌भवणाऱ्या आजारांचे सर्वेक्षण करावे 
- गावांमध्ये महापालिकेने पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी 
- नवीन पाइपलाइन टाकून जलकुंभाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी 
- महापालिकेने विहिरी, विंधन विहीर वापरावर बंदी आणावी 
- जीपीएस यंत्रणेद्वारे झिरपलेल्या रसायनयुक्त पाण्याचा शोध घ्यावा 
- वालदेवी नदीच्या पाण्याचे नमुने तपासावे 
- गावांमध्ये बैठका घेऊन दूषित पाण्याची माहिती पोचवावी 
- विभागनिहाय कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया व्हावी 

नगरसेवक म्हणतात... 
महापालिका नागरिकांकडून कररूपाने निधी संकलित करते. त्यातून आरोग्याची समस्या सोडविणे अपेक्षित आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे त्वचा रोगापासून कर्करोगापर्यंतचे आजार बळावत असतील, तर महापालिकेने या समस्या सोडविल्या पाहिजेत. 
- शशिकांत जाधव 

कचरा डेपोमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांशी संवादातून जनजागृतीची गरज आहे. मळे भागातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकून त्याद्वारे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. या भागातील विहिरींचा वापर पूर्णपणे बंद झाला पाहिजे. 
- भगवान दोंदे 

कचरा डेपोच्या पाच ते सहा किलोमीटर परिसरातील विंधन विहिरींचे पाणी वापरणे बंद करून महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात टॅंकरने पाणीपुरवठा करावा. मुकणे धरणातून शहराला थेट पाणीपुरवठा करण्यापूर्वी कचरा डेपो परिसरातील गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करावे. 
- संगीता जाधव 
-- 
पाथर्डी, पिंपळगाव खांब, गौळाणे, वाडीचे रान भागातील गावांमध्ये घरटी माणूस आजारी आहे. महापालिकेने आरोग्याच्या सोयी पुरवाव्यात. नागरिकांना विहिरी व विंधन विहिरींमधील पाण्याचा वापर न करण्याचे आवाहन करावे. कचरा डेपोत नव्याने आलेल्या कचऱ्यावर तत्काळ प्रक्रिया करावी. 
- पुष्पा आव्हाड 

डॉक्‍टर म्हणतात... 
दूषित पाण्याचा प्रभाव फक्त कचरा डेपोच्या परिसरातील गावांमध्येच नाही. उतारामुळे इंदिरानगरपर्यंत जमिनीत रसायनयुक्त पाणी मुरले आहे. वडाळा गाव परिसरातील जनावरे पाळणाऱ्या काठेवाडी नागरिकांच्या पोटांच्या आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. 
[डॉ. श्रद्धा वाळवेकर 
-- 
रसायनयुक्त पाणी सेवन केल्याने महिलांना पोटांचे आजार बळावतात. बायोऑक्‍सिजन डिमांड सर्वेक्षणाबरोबरच रासायनिक सर्वेक्षण व्हावे, भावी पिढीला आजारांपासून वाचविण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. 
डॉ. निवेदिता पवार 
-- 
पाथर्डी गाव व परिसरात टायफाईड व गॅस्ट्रो आजाराचे प्रमाण अधिक आहे. जुलाबातून रक्त पडत असल्याच्या रुग्णांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. पोटदुखीच्या औषधांची सर्वाधिक विक्री या भागात होते. हवा प्रदूषणामुळे बालदमा आजाराचे रुग्ण आढळतात. 
डॉ, अमोल मुरकुटे 
-- 
दूषित पाण्याच्या सेवनामुळे ऍलर्जीचे आजार बळावले आहेत. श्‍वसनाच्या रोगांमुळे येथील नागरिक त्रस्त असून, कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीचा परिणाम आहे. 
डॉ. सुशील अंतुलीकर 
-- 
पिण्याच्या पाण्यामुळे पोटांच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मूत्रपिंडाचे विकार, त्वचा लाल होणे, अंगाला खाज सुटणे, नाक, कान, घशाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. 
- महेंद्र राजोळे 
-- 
ग्रामस्थ म्हणतात... 
प्रत्येक घरात दर वर्षाला दोन ते तीन रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. कचरा डेपोसाठी जागा घेतल्या. पण अद्यापही महापालिकेने पिण्याचे पाणी दिलेले नाही. 
- त्र्यंबक कोंबडे 
-- 
विहीर, विंधन विहिरींचे पाणी प्यायल्याने अंगाला खाज येते. जनावरेसुद्धा पाणी पित असल्याने त्यांनाही त्वचाविकार झाले आहेत. 
- देवीदास जाचक 
-- 
दूषित पाण्याचा त्रास फक्त परिसरातील गावानांच आहे, असे नाही. वालदेवी नदीत पाणी मिसळते तेच पाणी चेहेडी बंधाऱ्यावरून नाशिक रोड भागासाठी उचलले जात असल्याने निम्म्या शहराला दूषित पाण्याचा त्रास आहे. 
- सोमनाथ बोराडे 
-- 
दूषित पाण्याच्या अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. अद्यापही त्याची दखल घेतली नाही. पूर्वी येथील द्राक्षांची निर्यात होत होती. ती बंद झाली आहे. 
- गोरख कोंबडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com