चिमुरड्यांसाठी खास बाल आधारकार्ड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

चिमुरड्यांसाठी खास बाल आधारकार्ड 

चिमुरड्यांसाठी खास बाल आधारकार्ड 

इगतपुरीः आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असे महत्त्वाचे कागदपत्र आहे. बॅंक खाते, आर्थिक व्यवहार आणि इतर अनेक महत्त्वाच्या व्यवहारांसाठी व्यक्तीकडे आधारकार्ड आवश्‍यक असते. हे आधारकार्ड आता लहानग्यांसाठीही अनिवार्य असणार आहे. पाच वर्षांखालील मुलांकडे आधारकार्ड असावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या मुलांना बाल आधारकार्ड देण्यात येणार आहे. एरवी आधारकार्डसाठी बायोमेट्रिक माहिती आवश्‍यक असते. पण बाल आधारकार्डबाबतीत त्याची आवश्‍यकता नसेल, असे सांगण्यात आले. 
याबाबत यूआयडीएआयने (UIDAI) ही घोषणा केली आहे. त्यानुसार पाच वर्षांखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल, असे सांगण्यात आले. पण हे मूल जेव्हा वयाची पाच वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्‍यक असणारी बायोमेट्रिक चाचणी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया मोफत होणार असून, पालक आपल्या पाल्याला घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात घेऊन जाऊ शकतात. यूआयडीएआयने बालआधार कार्डसाठी कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे, ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालू शकेल, असे म्हटले आहे. यामध्ये मान्यताप्राप्त शालेय संस्थेचे बालकाचा फोटो असलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. याबरोबरच यूआयडीएआय या नव्या निळ्या रंगाच्या आधारकार्डचे इन्फोग्राफिक्‍स तयार केले आहेत. पाच वर्षांच्या आतील मुलांना आधारकार्ड सक्तीचे नसले, तरीही परदेशातील शालेय उपक्रमांसाठी, शासकीय शिष्यवृत्तीसाठी त्याची आवश्‍यकता असते. मूल पाच वर्षांचे झाल्यावर मात्र हे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा यांची बायोमेट्रिक चाचणी करण्यात येणार आहे. 
 

Web Title: marathi news child aadharcard