मुलींना जपण्यासाठी एकत्र येऊया !

live photo
live photo

शिक्षण, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली युवती, महिला सुखरूप घरी परतेलच, याची बिनधास्त खात्री आजतरी किमान कुणी देऊ शकत नाही. वाढत्या अन्याय-अत्याचाराच्या घटना तर नित्याच्याच बनल्या आहेत. यातून महिला कधी नव्हे एवढी असुरक्षित बनली आहे. सतत भयात वावरणाऱ्या याच युवती, महिलांच्या सुरक्षेसाठी आता "सकाळ'च्या "तनिष्का व्यासपीठा'ने एक पाऊल पुढे टाकले आहे. अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याबरोबरच "तिच्या' सुरक्षेसाठी, भयमुक्त जीवनासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत काम करण्याचा, पाठबळ देण्याचा निश्‍चय केला आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. 7) "कॉफी विथ सकाळ'मध्ये हजेरी लावलेल्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना "तनिष्का व्यासपीठा'ने शब्द देत त्यांच्याकडूनही शहर-जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी घेतली आहे. तनिष्का व पोलिसांच्या सहकार्यातून महिलांच्या सक्षमतेची गुढी लवकरच उभारेल, असा आत्मविश्‍वास या निमित्ताने जाणवला. 

"कॉफी विथ सकाळ'च्या व्यासपीठावरून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी "तनिष्का'च्या महिला सभासदांशी मुक्तपणे संवाद साधत त्यांना चर्चेतून बोलते केले. डॉ. सिंगल म्हणाले, की पोलिस आणि जनता यांच्यातील दुरावा करण्यासाठी "कम्युनिटी पोलिसिंग' ही संकल्पना राबवली. परिणामी आज पोलिस आणि नागरिक यांच्यात थेट संवाद होतो आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या टोळ्या एकाकी पडून त्या समाजातून याच कम्युनिटी पोलिसिंगमुळे शहराबाहेर जातील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्याच वेळी महिलांमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता आली आहे. महिलांच्या कायद्यांविषयी जाणीव झाली आहे. शाळा-महाविद्यालयीन स्तरावर मात्र समाजात अजूनही पुरेशी जनजागृती नाही. त्यासाठी महिलांनी सामाजिक प्रश्‍न लक्षात घेऊन पुढाकार घ्यावा. 
... 
थेट समस्येसाठी मो. 9762100100 यावर संपर्क साधा. 

"सकाळ तनिष्का' सदस्यांनी महिलांच्या समस्या व अन्याय-अत्याचाराची माहिती देण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी एक पाऊल टाकले. दुसरीकडे, पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी 9762100100 या आयुक्तालयाच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकाची माहिती देत त्यांना तत्काळ पोलिस घटनास्थळी पोचतील, असे सांगितले. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी महिलांना असुरक्षिततेची जाणीव होईल, त्या वेळेस महिला पोलिस तुमच्या सुरक्षिततेसाठी तैनात होतील, अशी ग्वाही दिली. शहरातील महिला सुरक्षित तर शहर सुरक्षित, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्यांचे सर्वेक्षण 
डॉ. सिंगल म्हणाले, की शहरातील सिग्नलवर भिक्षा मागताना लहान मुले नेहमीच नजरेस पडतात. याबाबत पोलिस आयुक्ताच्या पुढाकारातून सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अशा मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. संघटित पातळीवर एक ठोस उपाययोजना केली जात आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विकास विभागाचीही मदत होत आहे. लवकरच भिक्षा मागणाऱ्या या मुलांचे व त्यांच्या पालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या आराखड्याला मूर्तस्वरूप देणार आहे. 

दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पोलिस 
शालेय-महाविद्यालयीन मुला-मुलींच्या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. यास पालक-पाल्यांमध्ये न होणारा संवाद कारणीभूत ठरतो, असे नमूद करून डॉ. सिंगल म्हणाले, की सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे 12 ते 18 वयोगटातील मुले-मुली भरकटत आहेत. याच वयात त्यांना सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करून देणे गरजेचे असते. याचसाठी पोलिस आयुक्तालयाचे सायबर पोलिस ठाणे व महिला पोलिस अधिकारी शाळा-महाविद्यालयांत जाऊन त्यांचे प्रबोधन करताहेत. आतापर्यंत दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोलिस पोचले आहेत. 

महिलांसाठी "विशाखा' 

शासकीय-निमशासकीय, शैक्षणिक, खासगी आस्थापनांत महिला कर्मचारी वरिष्ठांच्या लैंगिक शोषणाला बळी पडू नयेत, यासाठी विशाखा महिला सुरक्षा समिती नियुक्त केली आहे. महिलांनी आपल्यावरील अत्याचाराची माहिती थेट या समितीकडे नोंदविल्यास त्यावर कारवाई होते. 

डॉ. सिंगल म्हणतात.... 
- मानसिकता बदलण्याची गरज 
- महिलांनीही आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी 
- सोनसाखळी चोरी ही महिलांनी स्वत:हूनच चोरट्यांना दिलेली संधी 
- लग्न सोहळ्यासाठीचे दागिने मॉर्निंग वॉकला वापरणे चुकीचे 
- दागिने चोरट्याला सहजपणे खेचता येतील, असे परिधान करू नये 
- महिलेवर होणाऱ्या अन्यायाविषयी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com