सर्व शाळा, महाविद्यालयांना 'सीसीटीव्ही'सह संरक्षक भिंतीची लवकरच सक्ती

Dhule
Dhule

धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) आणि कळमसरे (ता. अमळनेर, जि. अमळनेर) येथील विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणी खानदेशात उसळलेला जनआक्रोश तैलिक समाजाचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून विधानभवनापर्यंत पोहोचला. त्यात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना "सीसीटीव्ही'सह संरक्षण भिंत, प्रवेशव्दार असणे सक्तीचेच केले जाणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 

दोंडाईचा येथे आठ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास मधल्या सुटीत नूतन हायस्कूलच्या मागील जागेत बालवाडीतील पाचवर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने लैंगिक अत्याचार केला. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला लवकर अटक व्हावी. कळमसरे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक जगदीश पाटीलने काही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले. त्यालाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तैलिक समाजाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी केली. तैलिक समाजालाच नव्हे तर इतर कुठल्याही समाजाला कुठल्याही वादासह राजकारणाशी काही देणे- घेणे नाही. नराधमांना कठोर शिक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी ऍड. उज्ज्वल निकम किंवा त्या क्षमतेच्या वकिलांची नियुक्ती करावी. पोलिस यंत्रणेने निःपक्षपणे न्यायदान करण्याची भूमिका बजवावी, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली जावी, अशी मागणीही या शिष्टमंडळाने विधानभवनाच्या आवारात गुरुवारी (ता. 1) मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह अन्य मंत्र्यांना निवेदन देत, चर्चा करताना अधिवेशनातून सर्वपक्षीय आमदारांनी आवाज उठवून पीडितांना न्याय मिळवून द्यावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रभावी उपाययोजनांविषयी नियोजन केले जावे, अशी आग्रही मागणी केली. 

"सीएम'सह विरोधकांना निवेदन 
अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, झेप फाउंडेशनच्या अध्यक्ष रेखा चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, अशोक चौधरी, धुळ्यातील कॉंग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ, राजेंद्र महाले, भाजपच्या माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलाकर अहिरराव, नगरसेविका प्रतिभा चौधरी, महादू अंबर चौधरी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. दोंडाईचातील बालिका अत्याचार प्रकरणी न्यायासाठी धुळ्यात आठ मार्चला तैलिक समाजासह अन्य सर्व समाजांतर्फे मूक महामोर्चा काढला जात आहे, अशी माहिती श्री. करनकाळ यांनी मंत्र्यांना दिली. 

शाळा, महाविद्यालयांसाठी नियम 
श्री. करनकाळ आणि तैलिक शिष्टमंडळाने शाळा, महाविद्यालयांमध्ये "सीसीटीव्ही कॅमेरे', चौफेर संरक्षक भिंत आणि शाळा, महाविद्यालयांच्या आवारात पडीक किंवा विनावापराच्या जागा, बंगलेही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणावेत, शाळा- महाविद्यालयांत प्रवेशद्वार असावेच, अशी मागणी मंत्री तावडे यांच्याकडे केली. त्यांनी सर्वच शाळा, महाविद्यालयांना "सीसीटीव्ही कॅमेरे', संरक्षक भिंत, प्रवेशव्दार नसल्यास ते व इतर आवश्‍यक उपाययोजनांबाबत लवकरच सक्ती केली जाणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com