सौरऊर्जा प्रकल्प खर्चासह  "डीपीआर' करण्यासाठी आग्रह 

residenational photo
residenational photo

नाशिकः नाशिकसाठीच्या दमणगंगा-एकदरे अन्‌ सिन्नरच्या दुष्काळी भागासाठीच्या गारगाई-अपर वैतरणा-कडवा-देवनदी जोड प्रकल्पातील उचल पाणीयोजना चालविण्यासाठी, विजेचा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा वापराचा आग्रह गुरुवारी (ता. 22) येथे धरण्यात आला. तसेच सौरऊर्जेचा समावेश सविस्तर प्रकल्प अहवालात करण्याची सूचना पुढे आली. बुडीत क्षेत्र, पुनर्वसन आणि प्रकल्पाची किंमत कमी करणे, पाण्याचा वापर अधिकाधिक व्हावा यावरही भर देण्याचे सुचविण्यात आले आहे. 
सिंचन भवनात राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्ल्यूडीए)चे मुख्य अभियंता एन. श्रीनिवास, जलसंपदाचे मुख्य अभियंता कि. भा. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, डी. के. शर्मा, खासदार हेमंत गोडसे, जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आदींची बैठक झाली. या वेळी वरील सूचना करण्यात आल्या आहेत. एकदरे प्रकल्पासाठी 32 अन्‌ सिन्नर प्रकल्पासाठी 35 मॅगावॉट ऊर्जेची आवश्‍यकता भासणार आहे. त्यामुळे या ऊर्जेसाठीच्या निधी उपलब्धतेच्या प्रश्‍नातून प्रकल्पांचा खोळंबा होऊ नये म्हणून सौरऊर्जेचा वापर महत्त्वाचा असल्याची बाब श्री. गोडसे यांनी अधोरेखित केली. 

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. गोडसे म्हणाले, की राज्य सरकारने दोन्ही जोड प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता दिली आहे. नाशिकला पाच व सिन्नरसाठी सात टीएमसी पाणी प्रस्तावित असून, एकदरेसाठी 859, तर सिन्नरसाठी दोन हजार 750 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांचा सविस्तर अहवाल तयार करण्यास सुरवात झाली आहे. नाशिकमधील "मेरी'मध्ये "एनडब्ल्यूडीए'च्या कार्यकारी अभियंत्यांचे पूर्वी कार्यालय होते. अलीकडच्या काळात नव्याने आणखी एका कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. एकदरे या प्रकल्पाच्या माध्यमातून गंगापूर धरणात नाशिकसाठी पाच टीएमसी पाणी अतिरिक्त उपलब्ध होणार आहे. त्यातून पिण्यासाठी अडीच, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील उद्योगांसाठी एक आणि सिंचनास दीड टीएमसी प्रस्तावित आहे. प्रकल्पांतर्गत एकदरे (ता. पेठ) गावाजवळ पाच टीएमसी क्षमतेचे धरण उभारण्यात येणार आहे. हे पाणी आठ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीतून 210 मीटर उंचीपर्यंत उपसा करून उमरद गावाजवळ खिरा डोंगरावर आणण्यात येईल. इथून पुढे साडेपाच किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून हे पाणी गंगापूर धरणात आणले जाईल. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी 18 कोटी 21 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 

सिन्नर अहवालासाठी 24 कोटींचा खर्च 
गारगाई-अपर वैतरणा-कडवा-देवनदी जोड या सिन्नरच्या प्रकल्पाच्या सविस्तर अहवालासाठी 23 कोटी 93 लाखांचा खर्च अपेक्षित आहे, असे सांगून श्री. गोडसे म्हणाले, की भोजापूर धरणाची क्षमता 361 दशलक्ष घनफूट आहे. हे पाणी सिन्नरच्या विकासासाठी अपुरे आहे. म्हणूनच प्रकल्पांतर्गत गारगाई-वाघ-वाल नदीवर पाच धरणे बांधून सात टीएमसी पाणी उचलून वैतरणा धरणात व पुढे थेट जलवाहिनीतून पाणी कडवा धरणात टाकण्यात येईल. कडवा धरणातून पुन्हा पाणी उचलून सोनांबे येथे देवनदीच्या उगमात येईल. सोनांबे धरणातून देवनदीच्या उगमात 2.1 टीएमसी पाणी सोडून पावसाळी कालव्याने सर्व पाझर तलाव भरण्यात येतील. सिन्नर शहर व तालुका आणि शिर्डीस पिण्यासाठी थेट जलवाहिनीतून 800 दशलक्ष घनफूट पाणी पुरविण्यात येईल. 2.6 टीएमसी पाणी सिन्नर-माळेगाव औद्योगिक वसाहतीस आणि प्रस्तावित दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यास पुरविण्यात येईल. उर्वरित 1.5 टीएमसी पाणी उच्चस्तरीय जलवाहिनीद्वारे डुबेरे-रामोशीवाडी-दापूर-दोडी-नांदूरशिंगोटे या गावांच्या मार्गे भोजापूर कालव्यास जोडण्यात येईल. 
.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com