जीवन प्रवाहाप्रमाणे बदलते  ती गझल : डॉ. यशवंत मनोहर 

residenational photo
residenational photo


महाकवी वामनदादा कर्डक आंबेडकरवादी गझल नगरी (नाशिक रोड), ता. 17 : जुन्यात न थांबता नवीन तंत्रांचा अवलंब करत गझल पुढे जात राहते. गझलमधील रदीफ, काफीया ओळींना घट्ट बांधतात. त्याचप्रमाणे गझल ही जीवनातील अनेक पैलू गुंफण्याची क्रीया असल्यामुळे गझल म्हणजेच जीवन लिहीणे, अशी सुबक आणि खोल मांडणी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केली. 

नाशिक रोडच्या के. जे. मेहता हायस्कूलमध्ये साकारलेल्या महाकवी वामनदादा कर्डक आंबेडकरवादी गझल नगरीत जनसाथी समाधान पगारे सभागृहात आज ज्येष्ठ गझल संशोधक डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते पहिल्या आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन व पिंपळाच्या रोपट्यास पाणी घालून संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष पाली साहित्याचे अभ्यासक नंदकिशोर साळवे, गीतकार हरेंद्र जाधव, ज्येष्ठ कवी प्रदीप आवटे, प्रवर्तक प्रमोद वाळके, सामाजिक कार्यकर्ते भीमराव शिरसाट, सानेगुरूजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जोशी, अध्यक्ष गणपत मुथा, खजिनदार मिलिंद पांडे, लेखक विठ्ठल शिंदे, अमोल बागूल, नितीन बागूल, राहूल बच्छाव आदी व्यासपीठावर होते. पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 
डॉ. मनोहर म्हणाले, की गझलीच्या अदाकारीची गुंफन जीवन प्रवाहाशी मिळतीजुळती असते. आंबेडकरवादी गझलेचा उगवलेला पहिला सुर्य अशी ओळख असलेले महागझलकार वामनदादा कर्डक हे गीतकार, गझलकारांचे दादा होते. संत कबिराप्रमाणे अवघ्या दोनच ओळींत संपूर्ण जीवनाचे हजार प्रश्‍न मांडण्याचे कसब त्यांच्याठायी होते. दादांच्या प्रतिभेची समिक्षा करण्याची ताकद साहित्य समिक्षकांमध्ये नाही. तथापि, समिक्षकांमधील जातींनी त्यांना ती करूही दिली नाही. निश्‍चित, शाश्‍वत असं काहीच नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. अशा बदलातून निर्माण झालेली दादांची गझल क्रांतीची गझल आहे आणि म्हणूनच ती आंबेडकरवादी आहे. 
स्वागताध्यक्ष श्री. साळवे म्हणाले, की छंद, व्यंजन, यमक, पद्य, वृत्त, मात्रा या अलंकारांचा वापर भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या लिखाणात करून ठेवला आहे. तथापि, वामनदादांच्या आंबेडकरवादी गझलांना बुद्ध धम्माचा वारसा आहे. त्यामुळे गझलांना अडीच हजार वर्षांचा इतिहास असल्याचे अभ्यासातून समोर येते. हा इतिहास ठासून मांडला जावा, हाच आंबेडकरवादी गझलवेध संमेलन भरवण्यामागील हेतू आहे. 

उर्दू, मराठी, आंबेडकरवादी अशा गझलांच्या विविध रूपांचा उहापोह करताना उद्‌घाटनपर भाषणात ज्येष्ठ गझल संशोधक डॉ. नदाफ म्हणाले, प्रेयसीशी हितगुज करणे म्हणजे गजल. तीला दीड हजार वर्षांचा इतिहास आहे. छंद शास्त्राची लघू, गुरू, मात्रांवर आधारीत गझल लोकभाषा झाली. कारण, तिच्यात लोकभाषा आहे. तुम्ही जे लिहीता तोच आपला छंद आहे. गझलेचा इतिहास, निर्मिती, प्रकार याच्या वादात न पडता गालिबच्या नजरेतून गझलकडे पाहा. 1253 ते 1325 या कालावधीतील संत नामदेवांच्या गाथेचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की त्यातही गझल आहे. त्यामुळे तेच पहिले गझलकार आहेत. वामनदादांच्या गझलांमधील छंदांचे विवरणही गझल सारखेच आहे. "अंधार प्यायलेला, तो सूर्य आज आला', ही गझल गाऊन डॉ. नदाफ यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 
या वेळी आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाची स्मरणीका, संग्राम पीटकची तिसरी आवृत्ती, भंते बुद्धपुत्र गुरू धम्मो यांचे "जगातले आठवे आश्‍चर्य', डॉ. आंबेडकर व डॉ. विठ्ठल शिंदे लिखीत "कलावंतांनी आपली संस्कृती आणि संस्कृती संघर्ष समजावून घ्यावा' या पुस्तकाची चौथी आवृत्ती अशा चार पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. प्रा. शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. ऍड. अरूण दोंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण कर्डक यांनी आभार मानले. 
--- 
संविधान मुसलशील 
देशाच्या संविधानाची रचना डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. त्यानुसार निर्माण झालेल्या लोकशाहीत केंद्र व राज्ये ही वेगळी आहेत. परंतु, प्रत्येक माणूस हा भारतीय आहे. वेगळेपणातही एकत्र बांधून ठेवणे म्हणजेच मुसलशील गझल होय. तुम्ही स्वतंत्र आहात, तरीही एकसंध आहात. त्यामुळेच भारताचं संविधान हे मुसलशील असल्याचे मत डॉ. मनोहर व्यक्‍त केले. 
----------- 
आजचे सत्र 
उद्या (ता. 18) सकाळी साडेदहाला डॉ. संजय मोहड यांचे गझल गायन, दुपारी बाराला मुशायरा, अडीचला आंबेडकरवादी गझलेचे सौदर्यशास्त्र या विषयावरील परिसंवाद, सायंकाळी चारला आंबेडकरवादी गझलेतील नक्षत्रमुद्रा हा परिसंवाद आणि सायंकाळी सहाला समारोपाचे सत्र. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com