''ते आठही वाचले असते...तर शौर्याचा जास्त आनंद झाला असता''

Salim Shaikh
Salim Shaikh

जळगाव : 'त्या आठही प्रवाशांचा जीव वाचवता आला असता, तर शौर्याचा आनंद साजरा केला असता..' अशा शब्दांत अमरनाथ यात्रेत दहशतवादी हल्ला झालेल्या बसचे चालक सलीम शेख गफूर यांनी भावना व्यक्त केल्या. गुजरातमधील बलसाड येथील यात्रेकरूंना अमरनाथ दर्शनाला घेऊन गेलेल्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 

सलीम शेख यांनी आज 'सकाळ'च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी त्या हल्ल्याच्या कटू स्मृती जागविल्या. 'त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आठही जीव वाचविता आले असते, तर शौर्याचा आनंद साजरा केला असता. मला जेवणात चपात्या वाढणाऱ्या दोन महिला सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला' असे सांगता सलीम भावूक झाले होते. 

जळगाव जिल्ह्यातील भडगाव पिंपरखेडचे मूळ रहिवासी असलेले सलीम शेख नोकरीनिमित्त गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. अमरनाथ यात्रेला यात्रेकरूंची बस घेऊन गेले असताना त्यांच्या बसवर रात्री सव्वा आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळ्यांचा वर्षाव केला होता. एका महिन्यानंतर सलीम शेख जळगावमध्ये आले. 'सकाळ'मधील संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये सलीम म्हणाले, "शहरात चालक म्हणून काम केले, तरीही जवळपास तेवढेच पैसे मिळतात. पण भाविकांच्या सेवेतून आनंद मिळणे काय वाईट आहे..! अनेकदा वयोवृद्ध भाविकांना खांद्यावर उचलून आणावे लागते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव, हृदयातून दिले जाणारे आशिर्वाद दुसरीकडे मिळणार नाहीत. त्या काळरात्री एक टायर पंक्‍चर झाले असतानाच बस पुढे नेत होतो आणि सव्वा आठच्या सुमारास दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी 60 ते 65 किलोमीटर वेगाने चाललेल्या माझ्या बसवर आधी समोरून हल्ला केला. त्यानंतर त्यांनी मागच्या बाजूनेही गोळीबार केला. त्यात दोन महिला दगावल्या. दहशतवाद्यांनी बसच्या केबिनमध्ये सुरू असलेले लाईट आणि त्यावरून माझ्या डोक्‍याच्या अंदाज लावत गोळीबार केला. बसमधील प्रवाशांच्या सीट काही उंचीवर असल्याने अनेक जणांच्या पायाला गोळ्या लागल्या; पण जीवितहानी कमी झाली. त्या हल्ल्यात दगावलेल्या बहुतांश भाविकांच्या घरी मी जाऊन आलो. अनेक सत्कार समारंभ झाले; पण आज ते आठही प्रवासी जिवंत असते, तर शौर्याचा खरा आनंद घेता आला असता.'' 

'बहुतांश गुजराती भाविक तांदुळाच्या पिठाच्या भाकरी खातात. ते मला खाणे जमत नाही. त्यामुळे त्या गटातील महिला चपात्या करत असत. कितीही धावपळ असली, तरीही त्या दोन महिला सहकारी स्वयंपाक करताना आधी माझ्यासाठी चपात्या करून देत असत. बसच्या मागून झालेल्या गोळीबारात त्या दोघींचा मृत्यू झाला', अशी आठवण सलीम यांनी सांगितली. 

ग्रेनाईड फुटले असते तर..! 
दहशतवद्यांनी गोळीबारासह एकामागून एक असे तीन बॉम्ब गाडीवर फेकले. सुदैवाने एकही फुटला नाही. अन्यथा गाडीतील चार गॅस सिलिंडर आणि डिझेलची टाकी यामुळे बसचा जळून कोळसा झाला असता. हल्ला झाल्यावर बस पाण्याने धुवावी, तसा रक्ताचा सडा धावत्या बसमधून कोसळत होता. तो हल्ला आणि ते चित्र अद्यापही डोळ्यांसमोर आले, तरीही अंगावर काटा उभा राहतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com