नाशिक इनोव्हेशन फेस्ट आजपासून बहरणार ! 

नाशिक इनोव्हेशन फेस्ट आजपासून बहरणार ! 

नाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील ऍड्‌. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या (ता. 15) दुपारी एकला विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते "फेस्ट'चा शानदार उद्‌घाटन सोहळा होत आहे.

"सकाळ'तर्फे "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' शुक्रवारी (ता. 16) सायंकाळपर्यंत विद्यार्थी, उद्योजक, नाशिककर, व्यावसायिक, शेतकरी अशा साऱ्यांसाठी विनामूल्य खुला राहील. उद्‌घाटन सोहळ्यासाठी महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. डी. पी. नाठे,मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महात्मा गांधी विद्यामंदिरचे सरचिटणीस प्रशांतदादा हिरे, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष महेश दाबक, "निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, "आयमा'चे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर, नाशिक शिक्षण समितीचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, "मविप्र'चे शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील, प्रा. संजय शिंदे, ऍड्‌. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. होळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. " 

फेस्ट'मध्ये अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण, वास्तुविशारद, पारंपारिक शिक्षणाप्रमाणेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शालेय विद्यार्थी, शिक्षक-प्राध्यापक, शेतकरी, अन्य व्यावसायिक अशा तीन गटांमध्ये प्रकल्प, बौद्धीक संकल्पनांचे सादरीकरण होत आहे. 

जगण्यासाठीचे स्मार्ट तंत्र 
"नाशिक इनोव्हेशन फेस्ट'साठी विद्यार्थी, शिक्षक-प्राध्यापक, शेतकरी, अन्य व्यावसायिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेला जोडणाऱ्या व्यवस्थेपासून ते जगण्यासाठीच्या स्मार्ट तंत्राचा समावेश "फेस्ट'मध्ये असेल. स्मार्ट हायब्रीड कुकींग प्रणाली, सौर ऊर्जेवर चालणारी कृषी उपकरणे, सुरक्षेसाठीचा रोबोट, सैन्यदलाच्या मदतीचे संशोधन, पाण्याच्या योग्य वापराचे तंत्र, स्मार्ट शहरातील स्मार्ट उपकरणांचा स्मार्ट वापर, आहार नियोजनाचे स्मार्ट तंत्र, कृत्रीम खतनिर्मिती, प्लास्टीकचा वापर करुन बांधकाम साहित्याचा वापर असे विविध प्रकल्प, बौद्धीक संकल्पना "फेस्ट'मध्ये जवळून पाहता येतील तसेच अभ्यासता येतील. 

डॉ. सुरेश नाईक यांचे शनिवारी व्याख्यान 
"सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. 17) सायंकाळी सहाला "इस्त्रो'चे माजी संचालक आणि इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक यांचे व्याख्यान होईल. नाशिकमधील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ते उपस्थितांशी "फ्यूचर इन स्पेस सायन्स' या विषयावर संवाद साधतील. याच सोहळ्यामध्ये "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'च्या तीन गटांमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात येईल. दरम्यान, डॉ. नाईक हे "पॉप्युलर स्पेस सायन्स'चे संचालक आहेत. "इस्त्रो'तर्फे विकसित केलेल्या सॅटेलाइट "पे-लोड' बिल्डींग टेक्‍नॉलॉजी साठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव राष्ट्रीय अन्‌ आंतरराष्ट्रीयस्तरावर करण्यात आला आहे. या सोहळ्यानंतर लगेच पानसुपारीचा कार्यक्रम होईल. सोहळ्यात सहभागी व्हावे अशी विनंती सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com