ए. पी. जे.' सरांच्या स्वप्नांना तरुणाईची संशोधनात्मक साद ! 

ए. पी. जे.' सरांच्या स्वप्नांना तरुणाईची संशोधनात्मक साद ! 

नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत जगातील पाच शक्तीशाली राष्ट्रांमध्ये समाविष्ट होईल असा आत्मविश्‍वास मांडला. त्यासाठी त्यांनी दिशादर्शनही केले होते. नेमका हाच विचार तरुणाईने गच्च पकडला असून मार्गक्रमण करत असल्याचे आशादायी वास्तव "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'च्या माध्यमातून पुढे आले.

"ए. पी. जे.' सरांच्या स्वप्नांना तरुणाईने संशोधनात्मक साद घातली असून धोरणांमध्ये बौद्धीक आविष्काराला प्रोत्साहन मिळण्याची संधी उपलब्ध झालीय. त्यातूनच सामाजिक प्रश्‍नांवर उत्तर मिळू शकेल, असा आशावाद "फेस्ट'च्या परीक्षकांनी नोंदवलाय. 

"सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त कालपासून (ता. 15) सुरु असलेल्या "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'ची आज सायंकाळी सांगता झाली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील ऍड्‌. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर भरलेल्या "फेस्ट'ला शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे गृहिणी, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली.

ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पियूष सोमाणी, कॉम्प्युटर सोसायटीचे माजी अध्यक्ष गिरीष पगारे, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, उद्योजक प्रदीप पेशकार, "मविप्र'चे उपसभापती राघोनाना अहिरे, संचायलक अशोक पवार, रायभान पाटील, शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, उदय आहेर आदींचा समावेश होता. ज्येष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी, नॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिरोडे, अपूर्वा जाखडी, "निमा'चे उपाध्यक्ष डॉ. उदय खरोटे, महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक (सुधारणा) संदीप जोशी, बॉशचे उपव्यवस्थापक ओंकार कुलकर्णी यांनी "फेस्ट' मधील संकल्पना, प्रकल्पांचे परीक्षण केले. परीक्षकांचा निकाल उद्या (ता. 17) सायंकाळी सहाला नाशिकमधील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या "सकाळ'च्या वर्धापनदिन सोहळ्यात जाहीर केला जाईल. तसेच वर्धापनदिनाच्या सोहळ्यात तीन गटातील विजेत्यांचा सन्मान करण्यात येईल. 

मृत्युंवरील नियंत्रण ते ऊर्जानिर्मिती 
लोखंडी खांबाऐवजी फायबर रिइनोर्स प्लास्टिक (एफआरपी) खांबाचे संशोधन तरुणांनी केले असून त्याची किंमत लोखंडी खांबापेक्षा पन्नास टक्‍क्‍यांनी कमी आहे. आयुष्यमान तिप्पट असताना अपघातातील मृत्युवर नियंत्रण मिळवणारी ही संकल्पना आहे. शिवाय पिझो इलेक्‍ट्रीकल क्रिस्टलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून वीजनिर्मिती होत आहे. त्याचा उपयोग जिने, स्पीड ब्रेकर, बुटामध्ये करण्यातून ऊर्जानिर्मिती होऊ शकते. बुटामधील वापरातून मोबाईल चार्जिंगपासून ते दुर्गमभागात कार्यरत असलेल्या सैनिकांना वायरलेस आणि उपकरणांना ऊर्जा वापरणे शक्‍य आहे. शिवाय पाइपलाइनच्या तपासणी रोबोटचा उपयोग पाणी आणि मलनिःस्सारण वाहिनांसाठी करण्यातून मजुरांचे मृत्यु टाळता येणारे आहे.

 वाहिनी फुटून वाहून जाणारे पाणी वाचवता येईल. "व्हायब्रेशन'च्या "सेन्शन'च्या माध्यमातून जंगलातील आग, वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य आहे. "स्मार्ट सिटी'मधील वाहतूक प्रश्‍नांवर उपाय म्हणून इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) वर आधारित वाहनतळ प्रणाली तरुणांनी शोधली आहे. त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे वाळूच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला असला असून त्यास तरुणांनी "पॉंड ऍश सॅंड'चा पर्याय खुला केला आहे. प्लास्टिकच्या माध्यमातून रस्ते निर्मितीचे संशोधन तरुणांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिक, अपंगत्व आलेल्यांपासून ते शारीरिक समस्या उद्‌भवलेल्यांना "अटेन्डट'ची आवश्‍यकता भासते. अशावेळी "हेडगिएर सेन्सर'मधून काय हवे याची सूचना मोबाईलद्वारे देणारे तंत्र विकसित करण्यात आले आहे. गर्दी व्यवस्थापनात महत्वाची बाब असते म्हणून गर्दीतील प्रत्येकाचे मापन होणे आवश्‍यक असते. त्यासाठीची "मॅट' विकसित करण्यात आली आहे. असे नानाविध संशोधन, प्रकल्प, संकल्पना, बौद्धीक संपदेचा आविष्कार "फेस्ट'मध्ये पाहताना प्रत्येकजण अचंबित होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 
 
 कुलकर्णी,शिरोडे,जाखडी म्हणतात... 
0 "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'मध्ये सहभागी झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या अधिक होती. तसेच त्या संशोधन अन्‌ कल्पकतेत आघाडीवर राहिल्यात 
0 समाजोपयोगी प्रकल्पांचे मुक्तकंठाने कौतुक करण्यापर्यंत सीमित राहण्याऐवजी प्रोत्साहन अन्‌ संधी देण्याची आवश्‍यकता 
0 साध्या कल्पना, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती यावर तरुण संशोधकांचा राहिला 
0 नाशिकच्या उद्योग जगताने अशा संशोधकांना दत्तक घेऊन मूलभूत संकल्पनांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्याचा होईल फायदा 
0 स्वच्छ-सुंदर नाशिकसाठी तरुणांच्या संशोधनात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यातून होणाऱ्या फायद्याकडे महापालिकेने लक्ष घालावे 
0 मर्यादित स्त्रोत, साधन-सामुग्रीतून उच्चदर्जाच्या तंत्रज्ञानाची उपकरणे "फेस्ट'मध्ये पाहिलेत 
0 कायदा-सुव्यवस्थेपासून ते आपत्तीच्या काळात उपयुक्त प्रकल्प तरुणांच्या संकल्पनामधून साकारलेत 
0 सरकारी धोरणांमध्ये उपयोग होऊ शकतो 

दिव्यांग मुलांची भेट 
प्रबोधिनी विद्या मंदिरच्या दिव्यांग मुलांनी आज "फेस्ट'ला भेट दिली. विविध प्रकल्प पाहताना या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जाणवला. अभियांत्रिकी व अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रकल्प पाहताना उत्सुकतेने ही मुले प्रश्‍न विचारुन शंकांचे समाधान करुन घेत होते. मनिषा नलगे, कुमदु कोतवाल, दीपाली पाटील, रवींद्र कांबळे, विनोद देवठक यांनी मुलांना प्रत्येक गोष्ट त्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com