केंद्रीय मंत्री आठवले भाजपची "शिकार' : संभाजी भगत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

जळगाव : केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले हे आज सत्तेसाठी धर्मांध पक्षासोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गापासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेला राग आहे. परंतु मला त्यांची दया वाटते. कारण भाजपने त्यांची "शिकार' केली असून ती अत्यंत वेदनादायी आहे. असे मत विद्रोही कवी व शाहीर संभाजी भगत यांनी जळगाव येथे "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

जळगाव येथे विद्रोही कवींचा जलसा कार्यक्रमासाठी ते आले असता जळगावच्या पद्‌मालय विश्रामगृहात भेट घेतली. भगत म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मी मित्र आहोत, आम्ही एकाच ताटात जेवलो. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे. त्याच प्रेमापोटी आपल्याला त्यांच्याबद्दल दया वाटते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या मार्गावर असलेल्या या नेत्याची भाजपने शिकार केली. त्यामुळे आज ते त्या विचारांपासून दूर गेले आहे, मंत्री झाल्यानंतर तर त्यांची आंबेडकरी विचारांची गाडी पूर्णपणे रुळावरून घसरली आहे. त्यामुळे त्यांना सुबुद्धी मिळावी आणि ते पुन्हा आंबेडकरी विचारांकडे यावेत एवढीच आपण प्रार्थना करू शकतो. 

महाराष्ट्रात "जातीच्या आर्मी' 
भीमा-कोरेगाव घटनेबाबत ते म्हणाले, महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून संबोधला जात होता. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी राज्यात "जातीच्या आर्मी' उभ्या केल्या आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पराभव करण्याचा प्रयत्न करून जाती जातीत "तोडफोड' करण्याची नीती अवलंबली आहे. महाराष्ट्रावर हे खऱ्या अर्थाने असलेले संकटच आहे. तर कठुआच्या घटनेने देशातील असंवेदनशीलता वाढली असल्याचे चित्र आहे. अशा घटनेत धर्माच्या नावाने समर्थन केले जाते हेच विचार करायला लावणारे आहे. 

लोकशाहीवादी पर्यायाची गरज 
देशभरात आज राजकीय धर्मांध हुकूमशहा शक्ती वाढत असल्याचे चित्र आहे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, की त्याला पर्यायासाठी आता लोकशाहीवादी पक्षांनी आणि लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय असूच शकत नाही. त्यांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवावे. देशभरातील धर्मांध शक्तींना बाजूला करून देशातील हे चित्र बदलू शकते असे भगत यांनी सांगितले.

Web Title: marathi news jalgaon aathawale bjp bhagat