चाळीसगावला धान्याची विक्रमी आवक 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

चाळीसगावला धान्याची विक्रमी आवक 

चाळीसगावला धान्याची विक्रमी आवक 

चाळीसगावः शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, यासाठी शासनाचे धोरण ठरेपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर तोडगा निघाल्याने आजपासून बाजार समिती पूर्ववत सुरू झाली. याबाबतची माहिती काल (ता. 23) शेतकऱ्यांना देण्यात आल्याने आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीला आणला. ज्यामुळे आज सुमारे दोन हजार पोत्यांची आवक झाली. धान्य खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून जवळपास कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचे दिसून आले. 
केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या आधारभूत किमतीवर शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भातील पुढील शासन निर्णय होईपर्यंत येथील बाजार समितीने आठ दिवसांपासून मालाची खरेदी- विक्री बंद केली होती. शेतमालाचा हमीभाव ठरविण्यासाठी सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी व बाजार समितीचे सचिव अशी समिती शासनाने नियुक्‍त केली होती. तसे पत्र बाजार समितीने संबंधिताना दिलेले होते. मात्र, तरीही सहायक निबंधक व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे बाजार समितीत माल खरेदी करणे शक्‍य होत नव्हते. परिणामी, शेतकऱ्यांचा माल लिलावाअभावी तसाच पडून होता. ज्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही व्यवहार ठप्प झाले होते. विशेषतः शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी लक्षात घेऊन बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी संयुक्त बैठक घेतली. यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, यावर चर्चा झाली. यात आठवड्यापासून बंद असलेल्या बाजार समितीत मालाच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज गहू, ज्वारी, बाजरी, मका आदींची सुमारे दोन हजार पोती आवक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजार समिती शेतकऱ्यांनी गजबजली होती. 
------------------ 
मका सर्वाधिक 
आज झालेल्या धान्य मालाच्या आवकमध्ये सर्वाधिक मका दिसून आला. एकूण मालाच्या 75 टक्‍के मक्‍याची आवक झाली होती. त्या खालोखाल ज्वारी, बाजरी व गव्हाची आवक झाली. मक्‍याला बाहेरच्या बाजारात तसेच त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनींकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. समितीतील काही व्यापारी मका परदेशातही पाठवत असल्याने त्यांनीही मक्‍याची खरेदी केली. 
------------------ 
असा मिळाला भाव 
मका ........ 1050 ते 1200 
ज्वारी ....... 1200 ते 1350 
बाजरी ...... 1200 ते 1600 
गहू .......... 1650 ते 2100 
....................
 

Web Title: marathi news jalgaon aavak