जि.प. शाळांच्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत. 

भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना टाकण्याची पालकांमध्ये क्रेज निर्माण झाली आहे. सध्या इंग्रजी शाळांचे पेवच फुटले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शाळांच्या जाहिरातीचे मोठ मोठे होर्डिंग ठीक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी आता नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा समावेश आपल्या अध्ययन अध्यापनात जिल्हा परिषदेचा शिक्षक करून घेत आहेत. यात डिजिटल क्‍लासरूम ही संकल्पनाही राबविली जात आहे. ठाणे जिल्हातील पष्टेपाडा या दुर्गम भागात संदीप गुंड यांनी हा प्रयोग जिल्हा परिषद शाळेत यशस्वी केला. त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली होती. त्यानंतर हजारो शाळा आता पर्यंत डिजिटल झाल्या आहेत. नवीन पद्धतीमुळे मुलांनाही शिक्षण घेण्यात मजा वाटत आहे. शाळांचे बाह्यरूपही बदलले आहे. रंगरंगोटी, स्वच्छता, स्वच्छ पाणी आदी सोयी लोकवर्गणीतून व स्व खर्चातून शिक्षकांनी केल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टींचे मार्केटिंग होणे आवश्‍यक असल्याचे लक्षात येताच सोशल मीडियाचा आधार घेण्याचे शाळेतील शिक्षकांनी ठरविले. गेल्या वर्षी हा प्रयोग यशस्वी झाल्यावर यंदा तो अधिक व्यापक प्रमाणात पाहायला मिळत आहे. यासाठी आकर्षक डिझाईन व शाळेच्या उपक्रमांचे फोटो टाकले जात आहेत. 

अशी आहे जाहिरात ः

जिल्हा परिषद शाळेची वैशिष्टे-मोफत प्रवेश, डोनेशन नाही, अनुभवी व कार्यकुशल शिक्षक वर्ग, नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचा वापर, टॅबलेट व मोबाईलद्वारे डिजिटल शिक्षण, इंग्रजी विषयाची विशेष तयारी, चित्रमय वर्ग खोल्या व परिसर. विविध उपक्रम-आनंद मेळावा, गॅदरिंग,योगासन वर्ग आदी मुद्दे आहेत. आपल्या गावातील शाळेतच प्रवेश घ्या बाहेरगावी शिक्षणासाठी लागणारा पैसा वाचवा असेही म्हटले आहे. 

राज्यातील तंत्रस्नेही चळवळीमुळे सरकारी शाळेतील गुरुजी देखील सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपल्या चांगल्या कामाचे मार्केटिंग करतोय ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट आहे. आज हजारो शिक्षक शाळेच्या नावाने स्वतःचा ब्लॉग चालवितात. याच बरोबर वेबसाइट, फेसबूक, इंस्टाग्राम तसेच व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो आहे. याचा परिणाम इंग्रजी माध्यमांच्या शाळांची क्रेज कमी होताना दिसत आहे. 
संदीप गुंड  राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार विजेते शिक्षक, पष्टेपाडा (जि. ठाणे) 

Web Title: marathi news jalgaon bhusawal social media school