जळगावच्या अधोगतीला भाजपच जबाबदार : रमेश जैन

ramesh jain
ramesh jain

जळगाव ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या जागांची "ऍडजेस्टमेंट' केली, असा होत असलेला आरोप चुकीचा आहे. ही निवडणूक "नुरा कुस्ती' तर नाहीच. उलट जळगावच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या भाजपशी आमचा लढा आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळ असताना जळगावला "वाघूर'चे पाणी मिळाले. त्यामुळे टंचाईवर मात झाली, हा आम्ही केलेला विकास टीका करणाऱ्यांना का दिसत नाही? असा टोला माजी महापौर रमेश जैन यांनी विरोधकांना लगावला आहे. 
शिवसेनेच्या प्रचारासंदर्भातील माहिती देण्यासाठी खानदेश मिल संकुलातील कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यात ते बोलत होते. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, माजी आमदार आर. ओ. (तात्या) पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ उपस्थित होते. 

अस्तित्व दाखवून देऊ ः सावंत 
जिल्हा संपर्कप्रमुख सावंत म्हणाले, की सुरेशदादा जैन यांनी मैत्रीचा हात पुढे केला होता. परंतु भाजपने तो नाकारला. आता शिवसेना ताकदीने मैदानात उतरली आहे. ज्या भाजप नेत्यांनी अस्तित्वाच्या लढाईचा मुद्दा केला आहे त्यांना आम्ही आमचे अस्तित्व दाखवून देऊ. आम्ही अन्याय सहन करणार नाही, कुणामागे फरफटत जाणार नाही. विकास हाच आमचा ध्यास असून, विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. 

भाजपने टक्केवारी सुरू केली ः जैन 
रमेश जैन म्हणाले, की आम्ही विकास केला नाही, अशी विरोधक टीका करतात, ते चुकीचे आहे. आम्ही "वाघूर'चे पाणी जळगावात आणून पाणीटंचाई नष्ट केली, झोपडपट्‌टीधारकांना पक्की घरे देऊन झोपडपट्टीमुक्त शहर केले, चांगले रस्ते निर्माण केले. आमचा हा विकास दिसत नाही का? महापालिकेवर कर्ज असणे म्हणणे चुकीचे आहे, आम्ही सर्व कर्जफेड केली. त्यामुळे आम्ही शासनाचे एकही पैसा देणे लागत नाही. तरीही शासन आमची अडवणूक करीत आहे. शासन महापालिकेबाबत भेदभाव करीत आहे. त्यामुळेच विकास थांबला आहे. सन 2001 मध्ये भाजपची सत्ता आली त्या काळात विकासकामे बंद करण्यात आली. सत्तेच्या काळात महापालिकेच्या कामांतही 10-20 ची टक्केवारी भाजपने सुरू केली. जळगावच्या अधोगतीला खऱ्या अर्थाने भाजपच जबाबदार आहे. त्यांच्याविरुद्ध आम्ही संघर्ष करू. शासनाकडून विकासासाठी 25 कोटी आले; परंतु जळगावच्या आमदाराने तोही खर्च होऊ दिला नाही. 

..तर शिवसेनेचे नेतेही प्रचारात 
जळगाव महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या स्टारप्रचारकांबाबत सावंत म्हणाले, की सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार सुरेशदादा जैन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे तसेच जिल्ह्यातील आमदार प्रचारात असतील. परंतु भाजपकडून जर नेते प्रचारात आले तर आमचेही नेते प्रचारात उतरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com