पॉलिशच्या बहाण्याने पावणेचार तोळे दागिने लंपास 

residentional photo
residentional photo

जळगाव : शहरातील मुक्ताईनगर येथे तांबे, पितळाचे भांडे, दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत दोन भामट्यांनी घरात प्रवेश मिळवला. सुरवातीला घरातील सर्व भांडे, चांदीचे देव चमकवून दिले, नंतर दागिनेही पॉलिश करून घ्या, असे सांगत इंदूबाई चौधरी यांच्या हातातील पावणेचार तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या उतरवून घेत दोघा भामट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरातील मुक्ताईनगर येथील रहिवासी इंदूबाई गोंविद चौधरी यांच्या घरी आज सकाळी दहाच्या सुमारास सेल्समनच्या वेशात एक तरुण आला. त्याने केमिकल पावडर विक्रेता असल्याची बतावणी करून तांबे, पितळाचे भांडे पॉलिश करून देतो, असे सांगितले. मात्र, इंदूबाईंचा मुलगा अनिल याने त्यास नकार देत आम्हाला पॉलिश करायची नाही किंवा तुमचे उत्पादनही नको, असे सांगत पिटाळून लावले. अनिल यांना ऑफिसला जाण्याची उशीर होत असल्याने त्यांनी आईलाही पॉलिश करू नको, असे सांगून ते निघून गेले. मात्र, पंधरा मिनिटांनंतर हा विक्रेता पुन्हा चौधरी यांच्या घरी आला. इंदूबाईंनी त्याला सॅम्पल म्हणून तांबे, पितळाचे भांडे दिले. त्याने ते स्वच्छ करून देत आपल्या पॉलिशचा महिमा कथन केला. थोड्याच वेळात देवघरातील देव आणा तेही चकाकून देतो, असे सांगत या तरुणाने देवघरातील मूर्ती मागविल्या. दहा-पंधरा मिनिटांत पॉलिश करून दिल्या. नंतर जाता-जाता सोन्याचे दागिनेही पॉलिश होतील, असे सांगत इंदूबाईंना दागिने आणण्यास सांगितले. पॉलिशच्या लालसेने त्यांनी हातातील चारही सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या. या भामट्याने पातेल्यात पाणी तापविले व आपल्याजवळील केमिकल टाकून त्यात बांगड्या सोडल्याचे सांगितले. पाणी थंड झाल्यावर बांगड्या काढून घ्या, असे सांगत त्याने काढता पाय घेतला. 

दुचाकीवर आले भामटे 
मुक्ताईनगर परिसरात इंदूबाई चौधरी यांच्या घरात सेल्समनच्या वेशात आलेल्या चोरट्याने 38.400 ग्रॅम वजनाच्या चार बांगड्या हातचलाखीने लंपास करून घराबाहेर पडला. बाहेर पाळतीवर असलेल्या त्याच्या साथीदाराने लगेच पॅशन दुचाकी काढली. दोघेही वाहनावर बसून पसार झाले. अनिल गोविंद चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांची जनजागृती निरुपयोगी 
जिल्हा पोलिसदलातर्फे महिलांची सोनसाखळी तोडणाऱ्यांची पद्धत, पॉलिशच्या बहाण्याने दागिने मागणाऱ्या गुन्हेगारांबाबत वारंवार बॅनर, पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येते, तरी सुद्धा उच्चशिक्षित कुटुंबातील महिलाच चोरट्यांचे सावज ठरत असल्याने गुन्हा घडल्यावर डोळे उघडल्याचा प्रत्यय येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com